गुन्हेगारी

नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्ह्यात पंधरा दिवसात अवैध धंदे चालकांविरुद्ध १ हजार १६३ गुन्हे 

उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानंतर कारवाई; २ कोटी २८ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र बैठका घेत अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. या चारही जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत १ ते १५ ऑगस्ट दरम्यान १ हजार १६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल २ कोटी २८ लाख ५९ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अवैध धंदेचालकांमध्ये हातभट्टीचालक, दारू विक्रेते, गुटखा, जुगार चालक ,अवैध वाळू माफिया यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे

नांदेड पोलीस परिक्षेत्रात हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी ३ ऑगस्ट आणि १० ऑगस्ट रोजी परीक्षेतील चारही जिल्ह्यात ‘मास रेड’ चे आयोजन करण्यात आले होते. संबंधित पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अंमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक अवैध धंदे हे लातूर जिल्ह्यात सुरू असल्याची बाब या कारवाईनंतर पुढे आली आहे.

नांदेड जिल्ह्यात २७ लाख ६६ हजार १९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये वाळूमाफिया विरुद्ध केलेल्या कारवाई १० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल तर जुगार चालवणाऱ्या विरुद्ध केलेल्या कारवाईत ५ लाख ६७ हजार ११९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशी दारू विक्रेत्यावरही कारवाई करताना ९ लाख ९ हजार ८६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हातभट्टी दारू आणि दारूचे रसायन यामध्ये १ लाख ८६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा माफिया मात्र नांदेड जिल्ह्यात हाती लागले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्यात केवळ १ हजार ३१० रुपयांचा गुटखा या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला आहे.

परभणी जिल्ह्यात देशी दारूचे विक्रीचे प्रमाण मोठे आढळले आहे. ८ लाख ८५ हजार २०९ रुपयांची देशी दारू तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १ लाख ४ हजार ७५५ रुपयांचा गुटखा परभणी जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात वाळू माफियांची मोठी चलती असल्याचे स्पष्ट झाले असून येथे १२ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल वाळूमाफियाकडून जप्त केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात एकूण ८ लाख ९८ हजार ७० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून सर्वाधिक कारवाई ही जुगाराविरुद्ध करण्यात आली आहे. ३ लाख ७८ हजार ४२० रुपये या जुगारावरील कारवाईत जप्त करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक मोठी कारवाई ही अवैध गुटखा विक्री करणाऱ्याविरुद्ध केली आहे. यामध्ये १ कोटी २९ लाख ८७ हजार ७४ रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. त्या खालोखाल देशी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध केलेल्या कारवाईत १० लाख ७८ हजार ६३१ रुपये, दारूचे रसायन, हातभट्टी दारू असा ५ लाख ९७ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगाराविरुद्ध केलेल्या कारवाईत १४ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत नांदेड जिल्ह्यात २७ लाख ६६ हजार १९७ रुपयांचा मुद्देमाल, परभणी जिल्ह्यात २३ लाख ७६ हजार ६५४ रुपये, हिंगोली जिल्ह्यात ८ लाख ९८ हजार ७० रुपये आणि लातूर जिल्ह्यात १ कोटी ६८ लाख १५ हजार ३५ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेत नांदेड जिल्ह्यात ३५६ गुन्हे, परभणी जिल्ह्यात २१८ गुन्हे हिंगोली जिल्ह्यात २१३ आणि लातूर जिल्ह्यात ३७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड पोलीस परीक्षेत १५ ऑगस्टपासून अवैध धंद्यांच्या निर्मूलनासाठी प्रत्येक पोलीस अधिक्षकांच्या अधिपत्याखाली त्या त्या जिल्ह्यात विशेष पथके तयार करण्यात आले आहेत. संबंधित पथकात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पाच अंमलदारांचा समावेश राहणार आहे. या पथकांना कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. सदर पथकाच्या कामगिरीचा आढावा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक हे दररोज घेणार आहेत. त्यांनी उघडकीस आणलेल्या अवैध व्यवसायाबद्दल या पथकांना बक्षीसही दिले जाणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे अवैध व्यवसाय आढळून येतील तेथील अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमहानिरीक्षक उमाप यांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात पाच विशेष पोलीस पथके, परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार तर हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारची तीन विशेष पथके स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनीही आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची या पथकांना माहिती देऊन या मोहिमेस हातभार लावण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!