
नांदेड : लोहा शहरामध्ये दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ३ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांविरुद्ध जुगार कायदा कलम १२ अ सोबत प्रथमच भारतीय न्याय संहिता कलम ११२ संघटित गुन्हेगारीचे कलमही आरोपीविरुद्ध लावण्यात आले आहे.
लोहा येथील मोंढा मच्छी मार्केट भागामध्ये बावन्न पत्त्यांचा हार जितचा जुगार सुरू असल्याची माहिती लोहा पोलिसांना मिळाली. सदर माहितीवरून लोहा पोलिसांच्या टीमने त्या ठिकाणी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी पकडले. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पत्त्याचे कॅट, रोख रक्कम, चार मोटारसायकल, ८ मोबाईल जप्त केले. उपनिरीक्षक रोडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन जुगार गुडगुडीवर छापा टाकून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाच्या बाहेर शेतामधील एका शेडमध्ये लॅपटॉप, की बोर्ड, माऊस चार्ट याच्या सहाय्याने ऑनलाइन गुडगुडीचा जुगार चालविण्यात येत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून लोहा पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेतातील शेडमध्ये जुगार चालविण्यात येत असल्यामुळे शेडमालकाला पण आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपनिरीक्षक रोडे व त्यांच्या टीमने केली.
अवैध धंद्यांची माहिती द्या: पो. नि. चिंचोलकर…लोहा पोलीस ठाणे हद्दीत कुठेही, कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांची माहिती असल्यास याबाबत लोहा पोलिसांना तात्काळ फोनद्वारे अथवा व्हाट्सअप वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार तसेच ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत लोहा पोलिसांची ही सलग दुसरी कारवाई ठरली आहे. यापुढेही अवैध धंद्यावरील कारवाई सुरूच ठेवली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिली.