
नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ९३ पैकी २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेपासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील ९३ मंडळांपैकी २६ मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. किनवट, हिमायतनगर, हदगाव, भोकर, मुदखेड आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५६.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३६.८० मिमी पाऊस किनवट तालुक्यात झाला तर १०३.४० मिमी पाऊस हिमायतनगर तालुक्यात पडला आहे. माहूर तालुक्यात ९३.६०, हदगाव तालुक्यात ८०.६०, भोकर तालुक्यात ६६.५० मिमी पाऊस पडला आहे. नांदेड ४४.७०, बिलोली ३६.४०, मुखेड २४.२०, कंधार २०.९०, लोहा ३१.८०, देगलूर २९.९०, मुदखेड ५७.५०, धर्माबाद ३३.७०, उमरी ४९.७०, अर्धापूर ५०.४० आणि नायगाव तालुक्यात ४५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात २६ महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक १७८.७५ मिलिमीटर पाऊस किनवट तालुक्यातील सिंदगी महसूल मंडळात झाला आह त्या खालोखाल १६५ मिलीमीटर पाऊस इस्लापूर मंडळात पडला आहे. जलधारा महसूल मंडळात १३८, मांडवा १५३.२५, दहेली ११२, उमरी बाजार १६०.२५, शिवणी १०२, किनवट १४०, बोधडी मंडळात ८१.२५ मिमी पाऊस झाला. हदगाव तालुक्यातील आष्टी महसूल मंडळात ११२ मिमी, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव मंडळात ११८.२५, सरसम मंडळात ११.५०, माहूर तालुक्यातील माहूर महसूल मंडळात ११७.७५, सिंदखेड मंडळात ९१.५० मिमी, वाई मंडळात ८८.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील या २६ महसूल मंडळात झाली अतिवृष्टी…जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील हदगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यासह तळणी, निवघा, मनाठा, तामसा, पिंपरखेड, आष्टी, भोकर तालुक्यातील किनी, किनवट तालुक्यातील किनवट, बोधडी, इस्लापूर, जलधारा, शिवनी, मांडवा, दहेली, सिंदगी, उमरी बाजार मुदखेड तालुक्यातील मुदखेड, हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, सरसम, माहूर तालुक्यातील माहूर, वानोळा, वाई, सिंदखेड आणि अर्धापुर तालुक्यातील अर्धापूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.