
नांदेड – राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्षपदी विजय चव्हाण यांची तर सचिवपदी मुगाजी काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विभागाच्या कार्यकारणी निवडीसंदर्भात संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी निवड समिती नेमण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाची बैठक राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर यांची पदोन्नतीने बदली नागपूर विभागात झाली असल्याने त्यांनी सदर पदाचा राजीनामा दिला. राज्याध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मान्य केला. नांदेड येथे दिनांक ८ सप्टेंबर रोजी विभागीय कार्यकारणी निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन मावळते विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर यांचा राजीनामा मंजूर करून छत्रपती संभाजीनगर विभागाची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. सदर निवडीदरम्यान तत्कालीन विभागीय संघटक विजय चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नांदेड जिल्हा अध्यक्ष मुगाजी काकडे यांची संघटनेच्या विभागीय सचिव पदावर निवड करण्यात आली. त्याचबरोबर महेंद्र गिरगे यांची विभागीय संघटक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी विभागीय उपाध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्याच्या भूमिपुत्र तथा तहसीलदार रेणापूर मंजुषा भगत व कुलदीप देशमुख यांची विभागीय उपाध्यक्षपदी तर गणेश सरोदे यांची सहसचिव, महेंद्र गिरगे संघटक, विजय पाटे कोषाध्यक्ष व गणेश चव्हाण आणि मृणाल जाधव यांची सहसंघटक म्हणून निवड करण्यात आली.
त्यासोबतच किरण अंबेकर यांचे कार्य पाहता त्यांना राज्यस्तरावर नेतृत्व देण्यात यावा, याबद्दल सर्व सदस्यांनी एकमुखाने मागणी केली होती. त्या मागणीचा मान राखून राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी किरण अंबेकर यांची मुख्य सल्लागार या पदावर नियुक्ती केली. त्यासोबतच परभणी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची सुद्धा सल्लागार या पदावर नियुक्ती केली. तत्कालीन विभाग सचिव विद्याचरण कडवकर यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. सदर विशेष सभेअंतर्गत ऑनलाइन मीटिंगही घेण्यात आली. निवडणूक आयोग यांची प्रशिक्षण असल्यामुळे अनेक सदस्यांनी ऑनलाईन मीटिंग अटेंड केली. सदर बैठकीदरम्यान त्यांनीही या निवडीबाबत समाधान व्यक्त केले. त्यासोबतच नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे, औरंगाबाद विभागातील विविध विषयाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न हे सोडवण्याकरता नियुक्त कार्यकारणी यांना सल्लागार महेश वडदकर यांनी मार्गदर्शन केले.



