क्राईम

नांदेडमध्ये परवानगी नसतानाही खुलेआम मद्यसेवन; चार धाबाचालकांसह ११ मद्यपींवर कारवाई 

जिल्हा पोलिस दलाच्या 'ऑपरेशन फ्लश आऊट'नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर आली जाग..!

नांदेड – जिल्ह्यात नांदेड पोलिसांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत विविध अवैध धंद्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून ही कारवाई अविरत सुरू आहे. त्यामध्ये गुटखा, वाळू, अवैध दारू, मादक पदार्थ विक्री, जुगार अड्डे यावर धाडी टाकल्या जात आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागालाही अखेर जाग आली. त्यांनी खुलेआम मद्य प्राशनास परवानगी दिलेल्या हॉटेल, धाब्यावर मद्यपानप्रकरणी बुधवारी रात्री चार धाबाचालकांसह ११ मद्यपींवर कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १८ सप्टेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल मराठी तडका नमस्कार चौक नांदेड, हॉटेल खालसा नमस्कार चौक नांदेड, हॉटेल सह्याद्री पासदगाव रोड पुयनी ता. नांदेड आणि हॉटेल राजेशाही पासदगाव रोड पुयनी ता.नांदेड येथे धाड टाकली. त्या ठिकाणी मद्यपानास परवानगी नसतानाही या हॉटेलमध्ये खुलेआम मद्यप्राशन केले जात असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे उपरोक्त चारही हॉटेलचे मालक, चालक त्यामध्ये दत्ताहरी आनंदराव गायकवाड, सिद्धार्थ चंपतराव कांबळे, नारायण गोविंदराव नागरगोजे आणि जनार्धन हिरामण मिरकुटे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क) (ख) आणि ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

नमस्कार चौकातील हॉटेल मराठी तडका येथे धाबाचालक दत्ताहरी गायकवाडसह मद्य प्राशन करणारे दिनेश कोंडीबाराव मगर, केशव विष्णू महाजन आणि गंगाधर बोधाजी पांडागळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणेच नमस्कार चौकातील हॉटेल खालसा येथे धाबाचालक सिद्धार्थ चंपतराव कांबळे यांच्यासह मद्य प्राशन करणारे तानाजी विश्वनाथ सोळंके, अजय रंगराव देशमुख, संदीप रामराव शिंदे, पुयनी पासदगाव रोडवरील हॉटेल सह्याद्री धाबाचालक नारायण गोविंदराव नागरगोजे यांच्यासह मद्य प्राशन करणारे साईनाथ शंकरराव मुंडकर, विजय शंकरराव मुंडकर, सुधाकर पुरभाजी हारकरी तसेच तरोडा रोडवरील पासदगाव येथील हॉटेल राजेशाही धाबा येथील धाबाचालक जनार्धन हिरामण मिरकुटेसह मद्य प्राशन करणारे विजय गणेश कल्याणकर, गजानन सोनाजी उराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयापुढे हजर केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाडे, संदीप शेट्टे, अमित वालेकर, रेणुका सलगरे, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, माणिका पाटील, संदीप देशमुख, श्रीमंत बोरुडे, अमोल शिंदे, नाईक, परते, टाकवाले, दुय्यम निरीक्षक शिवदास कुबडे, बळीराम इथर आदींनी ही कारवाई केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या धाब्यावर मद्य प्राशन केले जाते. इतकेच नव्हे तर ग्राहकांना थेट मद्यही उपलब्ध करून दिले जाते. ही बाब उघड उघड सुरू असताना कारवाई मात्र केली जात नव्हती. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानी कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अशा अवैध धाब्यावर दारू उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातूनही गुन्हेगारीला आळा घालण्यात यश येणार आहे.

… तर तीन ते पाच वर्षे कारावास किंवा २५ ते ५० हजारापर्यंत दंड …महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क) (ख) अन्वये अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादी चालक-मालक यांनी अवैध हॉटेल, धाबा, क्लबमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसताना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २५ ते ५० हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचवेळी एखाद्या ग्राहक, व्यक्तीने अवैध हॉटेल, धाबा क्लब आदी ठिकाणी मद्य प्राशन केल्यास त्यांना ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पिताना आढळून आल्यास धाबा मालकासह मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीविरोधातही कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!