
नांदेड – एका मजूर महिलेकडून २५ दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून ४ हजार रुपयांवर तडजोड करीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच कर्मचाऱ्याविरुद्ध यापूर्वीही वजीराबाद ठाण्यात पाणीपट्टी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
नांदेड महापालिकेचा स्वच्छता ठेकेदार आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कडे सदर तक्रारदार महिला ही कंत्राटी सफाई कामगार आहे. यातील लोकसेवक स्वच्छता निरीक्षक अकबर खान उस्मान खान हा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक एक येथे कार्यरत आहे. स्वच्छता निरीक्षक म्हणून तो काम पाहतो. तक्रारदार महिलेने ऑगस्ट २०२४ मध्ये पूर्ण महिनाभर सफाईचे काम केले. त्यामुळे सदर महिलेला ऑगस्ट २०२४ चा पूर्ण पगार मिळाला. त्यानंतर यातील आरोपी स्वच्छता निरीक्षक अकबर खान उस्मान खान याने सदर तक्रारदार महिलेस तुझे २५ दिवसांचे खाडे झाले आहेत. तू मला ५ हजार रुपये दे, नाहीतर मी चालू महिन्यात तुझे २५ दिवसांचे खाडे टाकतो असे म्हणून ५ हजार रुपये लाच मागितली.
याबाबत सदर महिलेने ३० सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून १ ऑक्टोबर २०२४ रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी पंचांसमक्ष कामाच्या दिवसाचे खाडे न टाकण्यासाठी अकबर खान याने ४ रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर चैतन्यनगर रस्त्यावर मंगेश मेडिकलसमोर स्वच्छता निरीक्षकाने सदर तक्रारदार महिलेकडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून २ हजार रुपये स्वतःच्या मोटरसायकलवर ठेवण्यास सांगितले. यावेळी त्याला सापळा रचून त्याला पकडण्यात आले. शहरातील विमानतळ ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये शेख रसूल, किरण कणसे, राजेश राठोड, प्रकाश मामुलवार आदींचा सहभाग होता. या प्रकरणातील आरोपी अकबर खान याच्याविरुद्ध नांदेड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पाणीपट्टी वसूल करून त्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा वजीराबाद ठाण्यात दाखल आहे असे असतानाही महापालिकेने सदर कर्मचाऱ्याला प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार सोपवला होता याचाच लाभ उठवत त्याने महिला मजुरांची आर्थिक पिळवणूक केली.
महापालिकेत मजुरांचीही होते पिळवणूक…शहर स्वच्छतेचे काम करताना वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण केली जाते. यात आता स्वच्छता निरीक्षकाकडून त्यांच्या अधिनस्त महिला मजुरांची पिळवणूक केली जात असल्याचे लाचेच्या या प्रकारावरून उघड झाले आहे. काम न करताही अनेकांना रक्कम दिली जात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या महिला मजूर नियमितपणे आपले काम करत असतात त्यांच्याकडूनही काही स्वच्छता निरीक्षक रक्कम उकळत असतात. याबाबत महापालिका कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवसातच हा लाचेचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने आपले कायम कर्मचारी ठेकेदाराच्या दावणीला बांधले आहेत. त्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे किती काम केले जाते हा संशोधनाचा विषय असला तरीही त्यांचे वेतन मात्र नियमितपणे काढले जात असते. त्यामुळे शहरात स्वच्छतेच्या नावाने कितीही बोंबा मारल्या जात असल्या तरीही ठेकेदार आणि मनपा अधिकाऱ्यांच्या मधुर संबंधामुळे कोणतीही कारवाई पुढे होत नाही, हे मात्र निश्चित.