नांदेड – नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मारकजवळ केक कापण्यासह मांसाहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांनी विसावा उद्यानात आता कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही डॉ. बेग यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड शहरातील एकमेव उद्यान असलेले माता गुजरीजी विसावा उद्यान सध्या सुट्ट्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे गर्दीने फुलले आहे. याच उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देत मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारलेले आहे. याच मुक्तीसंग्राम स्तंभाच्याखाली केक कापून पार्टीचा प्रकार पुढे आला होता. शनिवारी ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी याप्रकरणी संबंधितावर कारवाईचे आदेश दिले होते. त्याचवेळी असे प्रकार पुढे होणार नाहीत, याबाबतही खबरदारी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता तातडीने पावले उचलण्यात आले आहेत.
उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार आता माता गुजरीची विसावा उद्यानात कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्यानात प्रवेश करतानाच सोबत खाद्यपदार्थ नेले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. त्याचवेळी युवकांकडून विसावा उद्यानात वाढदिवसाचे प्रकारही मोठ्या प्रमाणात केले जात होते. या प्रकारालाही आता आळा घालण्यात येणार आहे. येथे आता कोणतेही वाढदिवस साजरे करण्यास बंदी घालण्यात आल्याचे डॉ. बेग यांनी स्पष्ट केले आहे. उद्यानामध्ये आता डीजेही वाजवता येणार नाही. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना शांतता तसेच स्वच्छतेचाही अनुभव येईल, त्यातून उद्यानात फिरण्याचा आनंद घेता येईल असे ते म्हणाले.
नांदेड शहरातील चैतन्यनगर शिवमंदिर ते श्रमिक कामगार पुतळापर्यंतच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केले जात आहे. नांदेड शहरासाठी हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून तयार केला जात आहे. या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारची लावण्यात आलेली काही झाडे मद्यपींनी तोडून टाकली आहेत. हा प्रकारही विकृत मनोवृत्तीतूनच केला होता. अशा मद्यपींवरही आता कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शहरात सुशोभीकरणासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असताना काही विकृतांकडून मात्र त्याचे नुकसान केले जात आहे.