
नांदेड – अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतर पित्याकडून मोबाईल दिला जात नसल्याने एका १७ वर्षीय युवकाने शेतामध्ये जाऊन गळफास घेतला. त्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे पाहून पित्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे गुरुवारी घडली. पिता पुत्राच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबिय आणि मिनकी गावावर शोककळा पसरली आहे.
मिनकी येथील राजू लक्ष्मण पैलवार हे मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या पत्नी, तीन मुलांसह राहत होते. त्यांचा ओमकार राजू पैलवार हा मुलगा इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. त्याने गेल्या काही दिवसापासून मोबाईल घेऊन देण्यासाठी पित्याकडे तगादा लावला होता. अभ्यासासाठी मोबाईल हवा असे तो सांगत होता. मात्र घरातील परिस्थितीमुळे पिता राजू पैलवार यांना मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही. बुधवारी रात्री राजू पैलवार आणि त्यांची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. यावेळी मुलगा ओमकार पैलवार यानेही मोबाईल देण्याची मागणी केली. मात्र पित्याने मोबाईल घेण्यास असमर्थता दर्शवली. याच रागातून ओमकार राजू पैलवार हा युवक शेतामध्ये केला आणि बुधवारी रात्री त्याने गळफास घेतला.
सकाळी पिता राजू पैलवार हे आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. ते शेतामध्ये आले. त्यावेळी शेतातील एका झाडाला मुलाचा ओमकारचा मृतदेह दिसला. ही बाब पाहताच त्यांना एकच धक्का बसला. त्यांनी मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरविले आणि दुःखावेगातून स्वतः ही त्याच झाडाला गुरुवारी सकाळी गळफास घेतला. ही हृदयद्रावक घटना काही वेळाने लक्षात येताच पिता पुत्रांना गावकऱ्यांनी रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या पिता पुत्राचे खतगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी बिलोली ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजच्या आधुनिक युगात मोबाईलचे महत्व अतिशय वाढत असले तरीही या पिता पुत्रांचे अनमोल जीवन मात्र याच मोबाईलमुळे संपले आहे. त्यामुळे मोबाईलचा हट्ट किती जीवघेणा ठरतो हेच या घटनेवरून सिद्ध झाले आहे. या घटनेचा अधिक तपास बिलोली पोलीस करत आहेत.