नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज महात्मा गांधी जयंती दिनापासून व्यसनमुक्त गाव मोहिमेला प्रारंभ होणार आहे. हदगाव तालुक्यातील शिऊर येथे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार असून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बाऱ्हाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी बुधवारी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात तंटामुक्त गाव समित्या स्थापन होणार आहेत. त्यासोबतच आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्तीसाठी ग्रामरक्षक दले आणि दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्यांची स्थापना केली जाणार आहे. या ग्रामरक्षक दलात गावातील लोकसंख्येप्रमाणे २५ ते ५० होतकरू तरुणांचा समावेश असेल. गाव पातळीवर घडणारे माला विरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना रात्रगस्त कामी आणि गाव पातळीवर व्यसनमुक्तीसाठी अशा ग्रामरक्षक दलांची पोलिसांना मदत होणार आहे.
महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात स्थापन होणाऱ्या अशा समित्यांना बळ द्यावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. प्रत्येक गावातील जबाबदार नागरिकांनी तरुणाईस व्यसनांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन हिरीरीने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. नांदेड पोलीस परीक्षेत्रात अवैध व्यवसायाच्या निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात विशेष पथके गठित करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी धाडसत्र सुरूच आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती निर्भीडपणे पोलिसांना द्यावी व अशा अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आपला हातभार लावणे गरजेचे असल्याचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे