क्राईम

‘ड्राय डे’च्या दिवशीही कुंटूरमध्ये अनुज्ञप्तीधारक दुकानात दारू विक्री सुरू..!

ठाण्यापासून काही अंतरावरच आहे दुकान, तक्रारीनंतर पोलीस म्हणतात चौकशी करू

नांदेड – संपूर्ण देश बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी अभिवादन करत असताना महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतात.  नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे मात्र अनुज्ञप्तीधारक देशी दारू दुकानात सकाळपासूनच दारू विक्री नेहमीप्रमाणेच सुरू केली. यानंतर गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली. त्यावर आता कुंटूर ठाणे अधिकाऱ्यांनी चौकशी करू असे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रात विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी रुजू होताच अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातही ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. यात अवैध दारू विक्री करणारेही रडारवर आले आहेत. त्यात आजच महात्मा गांधी जयंती दिनी विशेष उपमहानिरीक्षक उमाप यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्त गाव मोहीम सुरू होत आहे. ही मोहीम केवळ नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पोलीस परिक्षेत्रातील लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही राबविण्यात येत आहे. या मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. असे असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनुज्ञप्तीधारक दुकानात मात्र ‘ड्राय डे’च्या दिवशीही आज बुधवारी महात्मा गांधी जयंती दिनी सकाळी आठ वाजल्यापासूनच दारू विक्री सुरू करण्यात आली. दुपारपर्यंत ही दारू विक्री सुरूच होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनात ही बाब येताच त्यांनी कुंटूर ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी लगेच कारवाई न करता चौकशी करू असे उत्तर दिले आहे. तक्रार करताना पोलिसांना दारूचे दुकान सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ दिले आहेत. त्यामुळे आता या दुकान चालकाविरुद्ध कारवाई होईल की नाही याकडेही लक्ष लागले आहे. एकीकडे अवैध दारू विक्री रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना अनुज्ञप्तीधारक दुकानातून नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशा प्रकारांना आळा कोण घालणार हाच प्रश्न पुढे येत आहे.

दारू दुकान उघडण्याची वेळ सकाळी आठ वाजल्यापासूनच…दारू दुकानाची वेळ सकाळी १० नंतर असावी असा नियम असताना कुंटुर येथील देशी दारू दुकान सकाळी आठ वाजेपासून उघडते. दारू दुकानाच्या फलकावर ही वेळ नमूद केली आहे. त्यामुळे दारू दुकान उघडण्याच्या वेळेचे पालन का होत नसावे हा प्रश्नही आहे. वेळेपूर्वी दारूचे दुकान उघडल्याप्रकरणी नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी कारवाई केली होती.  मात्र आता पुन्हा पहिले पाढे सुरू असून काही दारू दुकाने तर सकाळी सहापासूनच उघडली जात आहेत. आता जिल्ह्यात व्यसनमुक्त गाव मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेत तरी आता दारू दुकानाच्या उघडण्याच्या वेळेचे पालन केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!