
नांदेड – आजारपणासह कुटुंबातील आर्थिक विवंचना या कारणामुळे मुदखेड तालुक्यातील जवळा बाजार येथे आई-वडील आणि दोन तरुण मुलांनी आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या घटनेत आई-वडिलांनी घरातच गळफास घेतला तर दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली जीव दिल्याचे आढळले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस विभागाकडून केला जात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली आहे. बारड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येमुळे नांदेड जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथील रमेश होनाजी लखे (वय ५०) आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे (वय ४५) यांचे मृतदेह २५ डिसेंबर रोजी सकाळी घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्याचवेळी त्यांची दोन मुले उमेश (वय २५) आणि बजरंग (वय २२) या दोघांनीही मुगट शिवारात जाऊन रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी बारड पोलिसांसह भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनीही धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस दलाकडून घेतली जात आहे.
एकूणच प्राथमिक माहितीनुसार लखे कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून आर्थिक विवंचनेत होते. रमेश होनाजी लखे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. या आजारपणामुळे त्यांना काही काम करता येत नव्हते तसेच जास्त फिरताही येत नव्हते. त्यांचा लहान मुलगा बजरंग हा नांदेड येथे वजिराबाद भागात एका घड्याळाच्या दुकानात काम करत होता तर दुसरा मोठा मुलगा उमेश हा सध्या हाती पडेल ते काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. एकूणच लखे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती पाहता ते अत्यंत बिकट अवस्थेत ते राहत होते. त्यांचे घर आजही मातीचे आणि खापराचे होते. घर गळू नये म्हणून घरावर ताडपत्री टाकली आहे. त्यांच्या घराजवळील इतर सर्व घरे पक्की आणि सुस्थितीत आहेत. घरामध्ये कोणताही वाद झाला नसल्याचे गावकरी सांगतात. जवळा मुरार येथे पोलीस तपासात त्यांचा इतर कोणाशीही वाद नसल्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या या मरणाचे कारण हे आर्थिक विवंचनाच असल्याचे प्रार्थमिकदृष्ट्या स्पष्ट होत आहे. इतर नातेवाईकही आता अधिक माहिती देण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
नांदेड जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होते. ही स्थलांतर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यासह हैदराबाद, कर्नाटक या भागातही होतो. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुका हा तसा सर्वात सधन मानला जातो; मात्र या मुदखेड तालुक्यातही गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आता नांदेड जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या निवडणुकीचा मौसम सुरू आहे. या निवडणुकीत अनेक आश्वासने राजकीय मंडळीकडून दिली जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील एमआयडीसीचाही प्रश्नही पुढे येतो. निवडणुका संपताच रोजगाराचा हा विषय मागे पडतो. दर सालाप्रमाणेच दिवाळी संपताच पुन्हा एकदा जिल्ह्यातून स्थलांतरणाचे चक्र सुरू होते.
लोको पायलटनेही घेतली आहे घटनेची नोंद…नांदेड – मुदखेड या रेल्वे मार्गावर मुगट रेल्वे स्थानकाजवळ बजरंग आणि उमेश या दोन्ही भावांनी रेल्वेखाली जीव दिला. या घटनेची नोंद या रेल्वे मार्गावरून चालणाऱ्या एका लोको पायलटनेही घेतली आहे. त्याच्या गाडीखाली गुरुवारी पहाटे २.३० ते ३.०० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत दोघेजण रेल्वे खाली आल्याच्या माहितीची नोंद त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही तरुणांची आत्महत्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी एका आखाड्यावर काम करणाऱ्या दोन्ही भावांच्या एका मित्राने त्यांना रेल्वे स्थानकाजवळ पाहिले होते. काही वेळानंतर त्यांच्या आत्महत्येची माहिती त्याला मिळाली. तो घटनास्थळीही पोहोचला होता.



