सामाजिक

बावरीनगर दाभड येथे शुक्रवारपासून ३९ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील खासदार तथा पूजनीय भदंत अतुरलीय रतन थेरो यांच्या हस्ते होणार, धम्मशिकवणींचा सखोल अभ्यास, आध्यात्मिक उन्नती आणि समविचारी धम्मबांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळणार

नांदेड — पौष पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी महाविहार बावरीनगर, दाभड (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे  २ व ३ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय ३९ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या तयारीने अंतिम टप्पा गाठला आहे. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था, मुळावा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद संपन्न होणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील  खासदार तथा पूजनीय भदंत अतुरलीय रतन थेरो यांच्या हस्ते होणार असून, धम्मध्वजारोहन पू. भदंत ज्ञानज्योती महास्थवीर (ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर) यांच्या हस्ते पार पडणार आहे. तसेच, ३९ व्या धम्म परिषदेनिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘संबोधी २०२६’ या स्मरणिकेचे प्रकाशन पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बौद्ध धम्मातील सखोल तत्त्वज्ञान, करुणा, मैत्री आणि प्रज्ञेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. वैचारिक प्रबोधन, चित्तशांतीची अनुभूती आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करणे, हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्त बावरीनगर परिसर आकर्षक व सुसंस्कृत सजावटीने तसेच बौद्ध प्रतीकांनी सजविण्यात आला असून, ध्यान, चित्तपरिक्षण व मनःशांतीस पूरक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अनुभवी अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ध्यानसत्रांमुळे उपस्थित उपासक-उपासिकांना चित्त एकाग्रतेतून उद्भवलेली शांत अनुभूती घेता येणार आहे.

बुद्धकालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ ओळखले जाणारे बावरीनगर हे स्थळ महाराष्ट्रासह देशभरात परिचित असून, महाराष्ट्र शासनाकडून यास तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे. अशा ऐतिहासिक व पवित्र धम्मक्षेत्री आयोजित ही परिषद बौद्ध धम्मपरंपरेतील एक महत्त्वपूर्ण वैचारिक व बोधप्रधान सोहळा ठरणार आहे. या बौद्ध उत्सवामध्ये समाजोपयोगी उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विविध सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून मोफत वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम तसेच अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यातून बौद्ध धम्मातील करुणा व परोपकाराचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित होतो.

ही दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उपस्थितांसाठी एक समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार असून, धम्मशिकवणींचा सखोल अभ्यास, आध्यात्मिक उन्नती आणि समविचारी धम्मबांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ही परिषद बौद्ध तत्त्वज्ञानाच्या सार्वकालिक व सार्वत्रिक मूल्यांची जाणीव करून देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या ३९ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस सर्व उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

या परिषदेकरिता श्रीलंकेतील पूजनीय भदंत अतुरलीय रतन थेरो यांच्यासह भिक्खु वालीवथुरे रतनसार थेरो व अन्य पाच भिक्खू उपस्थित राहणार आहेत. तसेच थायलंड येथून भिक्खु फ्रा येञ्चिन थेरो व भिक्खु लकी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भारतातून पूजनीय भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत प्रज्ञादीप महाथेरो (महासचिव, अखिल भारतीय भिक्खु संघ, बुद्धगया), भिक्खु ज्ञानदीप महाथेरो (नागपूर), भिक्खु डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खु एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खु विनयबोधिप्रिय थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु महाविरो थेरो (काळेगाव), भिक्खु धम्मानंद थेरो (बिदर), भिक्खु ज्ञानरक्षित (संभाजीनगर), भिक्खु धम्मशील (सारनाथ), भिक्खु बुद्धदत्त (बेंगळूर) आदी देश-विदेशातील विद्वान भिक्खूंच्या धम्मदेशनांचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!