
नांदेड – किनवट तालुक्यातील शिवणी बामणी आणि डोंगरगाव शिवारात सहा शेतकऱ्यांकडून गांजाच्या सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला होता. दिग्रस येथेही गांजा शेती केली होती. मात्र या समूह शेतीचे बिंग फुटले आणि नांदेड पोलिसांनी दोन रात्री पायी चालत जाऊन या शेतीतील सव्वा नऊ क्विंटल गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ४६ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील शिवणी बामणी (बेचिराख) व डोंगरगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर गांजा शेतीची लागवड झाल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून १ ऑक्टोबरच्या रात्री मिळाली. ही माहिती मिळताच किनवट, इस्लापूर, स्थानिक गुन्हे शाखा आरसीपी प्लाटूनचे १० पोलीस अधिकारी आणि १४० अंमलदार असा मोठा फौजफाटा बोलवण्यात आला. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या नेतृत्वाखाली हा पोलीस फौजफाटा कारवाईसाठी रवाना करण्यात आला. सदर पथकाने रात्रभर पायी चालत जात २ ऑक्टोबरच्या पहाटे शिवणी बामणी व डोंगरगाव शिवारात कापूस आणि तुरीसोबत केलेल्या गांजा शेतीचा शोध घेतला. यावेळी ४९६.९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी नीळकंठ विश्वनाथ शेळके, विनोद शिवाजी हुरदूके, संजय गोविंद हुरदूके, राजाराम सिदोबा बावधाने, कोंडबा गैयनाजी बावधने आणि ईश्वरदास किशन हुरदूके सर्व रा. डोंगरगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून डोंगरगाव शिवारात ही कारवाई सुरू असतानाच दिग्रस शिवारातही अमरसिंग साबळे याने गांजा शेतीची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे याच पोलीस पथकाने आपला मोर्चा दिग्रस शिवाराकडे वळविला. साबळे याने कापूस व तूर पिकात गांजा शेती केली होती. याठिकाणी कारवाई करीत पोलिसांनी २१ लाख ३७ हजार ९०० रुपये किंमतीचा ४२७.५८ किलो गांजा जप्त केला.
पोलिसांनी दोन दिवस रात्रभर पायी चालत जाऊन ही कारवाई करताना ९२४.४८ किलो गांजा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ४६ लाख २२ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध अंमली पदार्थ कायद्यान्वये किनवट ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस टीमचे कौतुक केले आहे.