
नांदेड – भूतलावरील माणुसकीच बेटं म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आनंदवन वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांना नांदेड येथील एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ‘समर्पित जीवन गौरव’ पुरस्कार ६ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील बोरबन फॅक्टरी एरिया येथील एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांची तर उद्घाटक म्हणून डॉ. विकास आमटे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा. सोमनाथ रोडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
नांदेड शहरांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात न्यूरोलॉजी व जनरल सर्जरी या विभागामध्ये गेल्या पाच वर्षापासून सेवा देणारे डॉ. निशिकांत एकलारे व डॉ. विद्या एकलारे यांच्या बोरबन फॅक्टरी एरियातील आनंद हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या ‘एकलारे हॉस्पिटल’चे उद्घाटन ६ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. विकास आमटे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ‘समर्पित जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास खा. डॉ. अजित गोपछडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. संजय जाधव, माजी खासदार हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, आ. राजू नवघरे, आ. डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. अंकुश देवसरकर, माजी नगराध्यक्ष गंगाबाई एकलारे यांच्यासह माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. पुरुषोत्तम दाड, डॉ. अच्युत बन, डॉ. शिरीष अर्धापूरकर, डॉ. किशोर पबितवार, डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. आनंद भगत, डॉ. विद्याधर भेदे, डॉ. पी.डी. देशमुख, डॉ. प्रल्हाद कोटकर, डॉ. संजय पडलवार, डॉ. राहुल लव्हेकर, डॉ. संदीप पंचलिंग, डॉ. दीपक मोटे यांची उपस्थिती राहणार आहे.
एकलारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या शुभारंभप्रसंगी आणि डॉ. विकास आमटे यांना दिल्या जाणाऱ्या समर्पित जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन एकलारे हॉस्पिटलचे संचालक डॉ. निशिकांत एकलारे आणि डॉ. विद्या एकलारे यांनी केले आहे
चौफेर विकासाचा ध्यास असणारे डॉ. विकास आमटे… डॉ. विकास आमटे नावाप्रमाणे विकासाचा व नवनवीन उपक्रमाचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. आनंदवनात शाश्वत पाण्याचा शोध, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून एकमेकांशी जोडलेले सोमनाथ येथील २२ व आनंदवनातील १२ तलाव, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू निर्माण करण्याचा प्रकल्प, प्लास्टिकचा पुनर्वापर प्रकल्प आणि टायरचा वापर करून बांधलेले बंधारे, पुरातत्त्वीय काळाची साक्ष देणारे हजारो दगडी अवशेष, जैवविविधतेनं नटलेलं ६५ एकरातील घनदाट जंगल, अभयारण्य व स्मृतिवनाची हिरवळ, मियावाकी अटल घनवन, विना लाकडांची आणि विना लोखंडाची टुमदार व घुमटाकार घरकुले, संगीताच्या तालावर दूध, दही, लोणी, तुपाची समृद्धी वाहणारी डेअरी, ट्रायसिकल पासून ते ट्रकची ट्रॉली, रेफ्रिजेटर्स व एअर कंडीशनर्स तयार करणारे अत्याधुनिक वर्कशॉप, दिव्यांगांमध्ये शिक्षण-प्रशिक्षणातून स्वावलंबी जीवनाचा साक्षात्कार पेरणारे कौशल्य तंत्रज्ञान, आनंदनिकेतन महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातून घडवले जाणारे जीवन शिक्षणाचे संस्कार, दररोजच्या हिंदी, मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन करून त्यातील महत्त्वपूर्ण लेख प्रयोग घटना व माहितीपर बातम्यांना स्केच पेनने रेखांकित करणे आणि ती सर्व कात्रणे काढून संबंधित फाईलमध्ये लावणे, जगभर – देशभर – राज्यभरातून येणाऱ्या हजारो पत्रांचा मजकूर वाचणे, त्यांची नोंद घेणे तसेच आनंदवनात येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे, त्यांना आनंदवन परिवाराची वैशिष्ट्ये समजावून सांगणे, आनंदवन परिवारातील कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे, राग-लोभ-तक्रारींचे समाधानकारक रीतीने निराकरण करणे, सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या पत्रांना सुंदर अक्षरात आटोपशीर व समर्पक उत्तरे देणे, आनंदवन प्रकल्पात चालणाऱ्या ३० वेगवेगळ्या युनिट्स अंतर्गत १४० प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेचे व्यवस्थापन पाहणे, श्रमर्षी बाबा आमटेंनी सुरू केलेली सोमनाथची श्रमसंस्कार शिबीरे गतिमान ठेवणे व त्यातून देशभरातील युवाशक्तीला ऊर्जा देणे, एवढ्या प्रचंड व्यापात असूनही नियमितपणे वर्षानुवर्षे आपल्या दैनंदिनीतील नोंदी अपडेट ठेवणे, मेगा किचन सौर ऊर्जा प्रकल्प, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीतून त्यांच्या कल्पकतेची, कुशल संघटनात्मक बांधणीची आणि असामान्य व्यवस्थापन कौशल्याची प्रचिती येते. एकाच वेळेस एवढ्या सगळ्या कामांत निष्णात असणारे डॉ. विकास आमटे यांच्यासारखे बहुआयामी संस्थाचालक माझ्या तरी पाहण्यात नाही.- प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर.