
नांदेड : जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग करण्याचा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधार येथील संभाजी नगर परिसरात पिकअप व्हॅन क्रमांक नंबर एमएच १४ जीयू ७७५१ मधील अनोळखी इसमाने कंधार येथील संभाजीनगर कंधार येथे आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांना भेटवस्तू वाटप करीत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास समाज माध्यमावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या परिसरात शासनाच्या वतीने फिर्यादीने प्रत्यक्ष भरारी पथकाद्वारे पाहणी केली असता सदर पिकअप व्हॅन आढळून आली नाही. मात्र या संदर्भातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात शासनाच्या वतीने राम ज्ञानोबा वारकड वय ४० वर्षे, व्यवसाय नोकरी कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार रा. संगुचीवाडी ता. कंधार यांनी दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी ३४०/२०२४ कलम १७०, १७३,२२३ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती लोहा विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यावर आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा कंधारमध्ये दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघ अतिशय संवेदनशील मतदार संघ मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राजकीय वैमनस्यातून एका राजकीय पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.