
नांदेड – जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच काही ठाणे प्रमुखांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केल्या आहेत. या बदल्यानंतर आता जिल्ह्यात आता वाळू माफियांवरील कारवाईला वेग आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकानेही बहुचर्चित म्हहाटी घाटावर सर्जिकल स्ट्राइक करत तब्बल चार कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. दहा जणाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या साधन सामुग्रीसह अवैध वाळू उपसा होत असताना स्थानिक पोलिसांना काहीही माहिती नसावे हेही एक नवलच आहे.
नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांना आला घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे विशेष पथक ९ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजता म्हहाटी शिवारातील वाळू धक्क्यावर पोहोचले. येथे इंजिन बोटच्या सहाय्याने नदीपात्रातून अमाप वाळू उपसा सुरु होता. सदर वाळू एका फायबर बोटीतून नदीकिनारी आणली जात होती. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली. या पथकात पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदीप वाघाडे आणि पोहेकॉ गजानन डवरे यांचा समावेश होता. या कारवाईत पाच हायवा ट्रक एक टिप्पर सहा जेसीबी आणि नदीपात्रातुन बाहेर काढलेले ६५ ब्रास वाळू असा ४ कोटी १३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान मुदखेड पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक गणेश कराड हे नुकतेच मुदखेड ठाण्यात रुजू झाले असताना ही कारवाई झाली. या अवैध वाळू उपसा प्रकरणात मुदखेड ठाण्यात शिवराज संभाजी ढगे, तुळशीराम शामराव हनुमंते, सदाशिव गोणेवाड, बळी दत्तराम ढगे, गुलाब जाधव, परमेश्वर जाधव, अवधूत गोविंदराव ढगे, उद्धव राजू जाधव, ज्ञानेश्वर आनंदराव जाधव आणि गजानन राजू जाधव या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे नांदेड पोलिसांनीही जिल्ह्यात अवैध वाळू माफिया विरुद्ध मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. नांदेड ग्रामीण कंधार विमानतळ आणि बारड पोलीस ठाणे हद्दीत पाच कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत १ कोटी ५१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत काळेश्वर मंदिर टी पॉइंटवर कल्लाळ गावाकडून येणारा हायवा ट्रक पकडण्यात आला. या प्रकरणात चालक सूर्यभान बाबूराव धुमाळ आणि निलेश उकंडराव तेली वाहन मालक या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हायवा ट्रक जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण ठाणे हद्दीत १९ ऑक्टोबर रोजी वसरणीकडून नावघाट पुलाकडे हायवा ट्रकमधून अवैध रेती नेली जात होती. पथकाने पाठलाग करून तो हायवा ट्रक पकडला. चालक श्रीकांत नागोराव दर्शने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून हायवा जप्त करण्यात आला आहे.
बारड पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी रेल्वे पाथरड मार्गे देगावकडे जाणारा हायवा ट्रक पकडला. वाहनचालक नागोराव नारायण पोत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून हा ट्रक जप्त करण्यात आला आहे. कंधार ठाण्याअंतर्गत बाळंतवाडी रोडवर रोहिदास किशन सूर्यवंशी हा आपल्या ट्रकमधून रेतीची चोरटी वाहतूक करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये विमानतळ पोलिस ठाणे हद्दीत माधव रमेश दुधमल हा हायवा ट्रकद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून हायवा ट्रक जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनावर खाली ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा पोलीस अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



