सामाजिक

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांत आता कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचा जागर..!

दुष्काळी परिस्थितीत शासन प्रशासनाकडून दुष्काळ निवारणासाठी वेगवेगळे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू, आत्मिक बळ देण्यासाठी संतविचारांचा अमृतमय ठेवा, अभंगांची गोडी, ओव्यांची सहजता आणि भारुडांचा लोकभाषेतील प्रभाव यांच्या माध्यमातून समाजमनाला घातली जाणार साद ..!

नांदेड : नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाची छाया गडद होत आहे. या परिस्थितीत शासन प्रशासनाकडून दुष्काळ निवारणासाठी वेगवेगळे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटाशी सामना करण्याचे आत्मिक बळ देण्यासाठी जिल्ह्यात आता प्रशासकीय पातळीवरही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कीर्तन ही केवळ भक्तिरसाची साधना नाही तर लोकशिक्षणाची, समाजप्रबोधनाची आणि जनजागृतीची प्रभावी लोकचळवळ आहे. संतविचारांचा अमृतमय ठेवा, अभंगांची गोडी, ओव्यांची सहजता आणि भारुडांचा लोकभाषेतील प्रभाव यांच्या माध्यमातून समाजमनाला साद घालणाऱ्या याच कीर्तनपरंपरेला आता दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी नवी सामाजिक दिशा मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकरी कुटुंबांसमोरील विविध संकटांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने कीर्तनकार, प्रवचनकार आणि प्रबोधनकारांना लोकजागृतीच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आलेल्या ‘अधिकृत प्रशासकीय आवाहन व मार्गदर्शिका (२०२६)’ या उपक्रमातून अध्यात्माच्या व्यासपीठाला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘आमचे आम्ही कीर्तन करू, लोकां उपदेशाचे अमृत पाजू’ या विचाराला कृतीची जोड देत गावागावांत जनजागृतीचा दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनाला स्पर्श करणारा संदेश घराघरांत पोहोचवता येतो. त्यामुळे शासकीय योजनांची माहिती, संकटसमयी उपलब्ध मदत आणि सामाजिक सुधारणांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कीर्तनकारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शेतकऱ्याच्या आयुष्यात पशुधन हे केवळ उपजीविकेचे साधन नसून कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असते. दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनतो. या पार्श्वभूमीवर चारा व्यवस्थापन, चारा छावण्यांबाबतची माहिती आणि उपलब्ध शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘चारा मित्र’ या संकल्पनेतून चारा व्यवस्थापनासाठी सहकार्य करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहित करणे, तसेच पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा योग्य प्रक्रियेद्वारे चारा म्हणून वापर करण्याबाबत जनजागृती करणे, यावरही भर देण्यात आला आहे. “शेतकऱ्याचे पशुधन हे केवळ पशुधन नसून कुटुंबाचा आधार आहे; चारा वाचवा, पशुधन वाचवा!” हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण भागात पाण्याचे प्रत्येक थेंब अनमोल आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठा यांचे योग्य नियोजन करण्याबाबत ग्रामस्थांना प्रबोधन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नळ, पाइपलाइन तसेच टाक्यांमधील गळती निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासनाला त्वरित माहिती देणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण करणे, या बाबींवर भर देण्यात आला आहे. घर, शाळा, मंदिरे आणि गोठ्यांच्या छतांवरील पावसाचे पाणी साठविणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि नव्या बोअरवेलच्या निर्मितीऐवजी उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याची मानसिकता निर्माण करणे, हा या जनजागृतीचा महत्त्वाचा भाग आहे.

दुष्काळ आणि आर्थिक संकटांच्या काळात कुटुंबांवरील आर्थिक ताण अधिक तीव्र होतो. अशा वेळी विवाहसोहळ्यांतील अनावश्यक खर्च टाळणे, सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे आणि विवाहातील बचत मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हुंडा घेणे आणि देणे ही सामाजिक अनिष्ट प्रथा असून, तिच्यामुळे वधूच्या कुटुंबावर आर्थिक व मानसिक ताण निर्माण होतो. त्यामुळे हुंडामुक्त विवाहाचा संकल्प, बालविवाहाला प्रतिबंध, मुलींचे शिक्षण आणि त्यांचा कौशल्यविकास यांसारख्या विषयांवर कीर्तनकारांनी समाजमन जागृत करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कीर्तनाच्या समारोपावेळी ग्रामस्थांकडून पाणीबचत, जलव्यवस्थापन, शेतकरी व पशुधन संवर्धन, शासकीय मदतीसाठी अधिकृत कार्यालयांशी संपर्क, अनावश्यक सामाजिक खर्चाला आळा, बालविवाह व व्यसनांना नकार आणि संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आधार अशा पाच प्रमुख संकल्पांचे सामूहिक वाचन करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे कीर्तनाचे व्यासपीठ केवळ भक्तिभाव जागविणारे न राहता ग्रामविकास, सामाजिक परिवर्तन आणि लोकसहभागाचे प्रभावी माध्यम ठरू शकते. संतांनी आपल्या अभंगांतून समतेचा, करुणेचा आणि मानवतेचा संदेश दिला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत आजच्या काळातील संकटांवर समाजाला एकत्र आणण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे. संतवाणीला समाजहिताची जोड, भक्तीला कर्तव्याची किनार आणि प्रबोधनाला कृतीची साथ मिळाली, तर गावागावांत परिवर्तनाची नवी पहाट उगवू शकते. दुष्काळाच्या काळ्याकुट्ट सावल्यांमध्ये आशेचा दीप पेटविण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा आणि ग्रामस्थांनीही या जनजागृतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुष्काळाची झळ केवळ शेतातील पिकांना बसत नाही, तर ती शेतकऱ्याच्या मनालाही पोहोचते. चिंता, नैराश्य, भविष्याची भीती आणि आर्थिक विवंचना यांचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना भावनिक आधाराची गरज असते. अशा वेळी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, संवाद साधणे आणि योग्य मदतीपर्यंत पोहोचविणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आत्महानीचे विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना दोष न देता त्यांचे म्हणणे समजून घेणे, त्यांना एकटे न सोडणे आणि तज्ज्ञांची मदत मिळवून देणे, याबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी मार्गदर्शिकेत शिवार हेल्पलाइन क्रमांक ८९५५७७१११५, राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन टेली-मानस १४४१६, रुग्णवाहिका सेवा १०८ आणि पोलीस मदत क्रमांक ११२ यांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!