क्राईम

नांदेडमध्ये पोलिसांनी घातल्या सराईत गुन्हेगाराच्या गाडीवर गोळ्या, तीन पथक शोधात रवाना

गुन्हेगारांनी घातली पोलिसांच्या अंगावर गाडी, फुटलेल्या टायरची गाडी घेऊन गुन्हेगाराने काढला पळ, कौठ्यातील मुख्य रस्त्यावर घडला थरार..!

नांदेड – वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असलेला सराईत गुन्हेगार नांदेडमध्ये आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गाठले. पोलिसांना पाहताच पिस्तूलसह सज्ज असलेल्या गुन्हेगाराने पळ काढण्यासाठी थेट पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. त्यावेळी बचावासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी गुन्हेगार असलेल्या गाडीच्या टायरवर गोळ्या झाडल्या. यात टायर फुटले. त्यावेळी पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्या गुन्हेगाराने फुटक्या टायरनेच गाडी घेऊन पळ काढला. हा सर्व थरार  कौठ्यातील रवीनगर भागात घडला. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्यातील तीन प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपीवर गोळ्या झाडल्या आहेत हे विशेष.

शनिवारी रात्री पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असलेल्या तीन आरोपींपैकी सुरज सिंग उर्फ सुरेंद्रसिंग जगतसिंग गाडीवाले (वय २४) हा नांदेडमध्ये आला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक कौठा भागात पोहोचले. कौठ्यातील रवीनगर भागात गाडीवाले सह इतर दोघेजण विना नंबरच्या काळ्या टाटा हरियर गाडीमध्ये होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलिसांची आणि त्या गुन्हेगाराची गाडी समोरासमोर लागली. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत आहेत हे पाहून त्या गुन्हेगारांनी पोलीस पथकावरच प्राणघातक हल्ला केला. पोलिस अंमलदार बोधगिरे यांना गाडीची धडक देऊन त्यांना जखमी केले. इतकेच नव्हे रस्त्याने ये जा करणाऱ्या इतर टू व्हीलर चालकांनाही धडक देऊन पाडले. त्यावेळी प्रतिबंध करण्यासाठी आणि स्वसंरक्षणार्थ सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी त्यांच्या पिस्टलमधून गाडीच्या टायरवर गोळ्या झाडल्या. त्यात गाडीचा टायर फुटला तरी त्या गुन्हेगारांनी तशीच गाडी रवीनगर चौकाकडे गाडी घेऊन पळाले.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. त्यानंतर हे पोलीस पथक व ग्रामीण पोलीस यांनी सदर गाडीचा पाठलाग करून शोध घेतला. सदर आरोपींनी असर्जन गावाच्या पुढे पांदण रस्त्यावर गाडी सोडून त्या ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेत जंगलामध्ये पळ काढला. ग्रामीण पोलिसांनी त्या गुन्हेगारांची घटनेतील गाडी जप्त केली असून ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा शाखेच्या तीन टीम आरोपीचा शोध घेत आहेत. सपोनि घोगरे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बीएनएस १०९,४९,१३२,१२१(१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळ तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच तपासासंदर्भाने आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

हद्दपारी, प्रतिबंधक कारवाईसह नांदेड, हिंगोलीसह कर्नाटक राज्यातील ठाण्यात आहेत नऊ गुन्हे दाखल…पोलिसांना हव्या असलेल्या सुरजसिंग उर्फ सुरेंद्रसिंग गाडीवाले याच्याविरुद्ध १७ मे २०२४ रोजी एक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नांदेडमधील वजीराबाद ठाण्यात दोन, अर्धापूर, शिवाजीनगर, विमानतळ यासह शेजारील हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, बासंबा तसेच कर्नाटक राज्यातील बसवकल्याण जि. बिदर या ठाण्यात वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!