राजकीय

नांदेड जिल्हा भाजपात हकालपट्टीचे सत्र सुरूच, आणखी एका बंडखोरावर कारवाई

नायगावात होटाळकरांनी उमेदवारी मागे घेऊन पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध सुरू ठेवला आहे प्रचार, गोजेगावकरांपाठोपाठ होटाळकरचीही हकालपट्टी

नांदेड – ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेड महानगराध्यक्ष, उत्तर विधानसभा प्रमुख, माजी जिल्हाप्रमुख अशा वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई केल्यानंतरही  भाजपाचा कारवाईचा धडाका अजूनही सुरूच आहे. नायगाव येथील शिवराज पाटील होटाळकर यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल कारवाई करताना पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. भाजपाचे हे हकालपट्टीचे सत्र सुरू असले तरीही पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते जुन्या नेत्यांच्या प्रचारात असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतीय जनता पक्षात जिल्हा उपाध्यक्षपदी राहिलेले शिवराज पाटील होटाळकर यांनी विधानसभा निवडणुकीची मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आणि पाठिंब्यावर त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र जरांगे यांनी उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी मोठ्या जड अंत:करणाने नायगाव लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली होती. मात्र यानंतरही त्यांनी स्वतंत्र बैठका घेत महायुतीचे उमेदवार राजेश पवार यांच्याविरुद्ध मोठी आघाडी उघडली आहे. ही आघाडी प्रभावी ठरत असल्याचे चिन्ह दिसू लागताच याबाबत पक्षाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याचे पत्र देण्यात आले आहे. तर दुसरीकडे होटाळकर यांनी आपण राजेश पवार यांना पराभूत केल्यानंतरच स्वस्थ बसू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे नायगावमध्ये महायुतीविरोधातील वातावरण मोठ्या प्रमाणात पेटले आहे.
मुखेड मतदार संघात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले व्यंकटराव गोजेगावकर यांनीही अपक्ष उमेदवार तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक बालाजी पाटील खतगावकर यांच्या समर्थनार्थ आपली ताकद लावली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांना निश्चितपणे पराभूत केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यात राठोड यांचे चुलत बंधू संतोष राठोड यांची उमेदवारीही महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. गोजेगावकर यांचीही दोन दिवसापूर्वीच भाजपाने हकालपट्टी केली आहे.
 दरम्यान, होटाळकर यांनी मात्र आपण आपल्या पदाचा राजीनामा वर्षभरापूर्वीच दिला होता. इतकेच नव्हे तर आपला राजीनामा मंजूर करावा याबाबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे यांना स्मरणपत्रही दिले होते. त्यामुळे आता पक्षाने केलेल्या कारवाईला कोणताही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महायुतीने उमेदवार उभे केले आहेत या उमेदवारांच्या विरोधात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी करताना भाजपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची छुप्या पद्धतीने या बंडखोरांना साथ मिळत आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना गट चिंतेत आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही नांदेड दक्षिणमध्ये वर पंजा आणि खाली कमळ असा प्रचार केला जात असल्याने नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेचे बोंढारकर आतापासूनच अडचणीत आले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भोकरमध्ये ठाण मांडले आहे. तर उर्वरित पदाधिकारी, कार्यकर्ते हे लोहा -कंधारमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे आहे त्या यंत्रणेवर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर चैतन्य निर्माण झाले असले तरीही हे चैतन्य त्या- त्या विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र महायुती प्रमुख नेत्याविनाच प्रचारात आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या बंडखोरांचा इतिहास पाहिल्यास त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले जाते. त्यामुळे आताची बंडखोरीही त्याच पद्धतीची आहे की काय याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!