
नांदेड – संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याचवेळी नांदेडमध्ये विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार आहे. या निवडणूक निकालानंतर विनापरवानगी शुभेच्छा बाबतचे जाहिरात फलक, पोस्टर, किऑस, झेंडे, भित्तीपत्रके लावू नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या आदेशाची नांदेडात काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नांदेड शहरात कोणीही विनापरवानगी बॅनर, पोस्टर लावल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा नांदेड महापालिकेचे उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांनी दिला आहे. याबाबत संपूर्ण क्षेत्रिय अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले आहेत. कुठेही विनापरवानगी बॅनर, पोस्टर लावल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे उपायुक्त संधू यांनी सांगितले
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी सात वाजेपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे साधारणत: चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा नांदेड महापालिकेअंतर्गत येतात. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीचा भागही समाविष्ट आहे. या निकालानंतर नांदेड महापालिका हद्दीत विजयी उमेदवारांचे बॅनर लावले जाण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण राज्यात हे शुभेच्छा फलक, पोस्टर, बॅनर, झेंडे, भित्तीपत्रके विनापरवानगी लावू नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी आदेश दिले आहेत.
या आदेशाची नांदेडमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीमध्ये विनापरवानगी जाहिरात फलक, पोस्टर, बॅनर, किऑस, झेंडे, भित्तीपत्रके लावणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महापालिका आकाशचिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम २०२२ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र विद्रुपण प्रतिबंध कायदा १९९५ नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निर्देश उपायुक्त तथा नोडल अधिकारी स. अजितपालसिंघ संधू यांनी दिले आहेत.