
नांदेड – आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कंधार -लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा, जिल्ह्यातील एका विधानसभेवर मुस्लिम समाजाला उमेदवारी देत संधी द्यावी, प्रथम पक्षातील निष्ठावंतांना संधीसाठी प्राधान्य द्यावे, जिल्हा पातळीवर काँग्रेस पक्ष प्रवेश झाल्याशिवाय वरिष्ठांनी इतर पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेशाबद्दल संवादाची संधी देऊ नये आदीसह पक्षसंघटन, पक्षशिस्त व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमुखाने संमत करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (ता.२३) रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वपुर्ण ठराव संमत करण्यात आले.
कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. जनता सोबत आहे. पण आघाडी धर्माच्या नावाने हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नाही. पण आता या मतदारसंघातुन काँग्रेसलाच संधी द्यावी, असा ठराव एकमुखाने संमत करत, कंधार -लोहा विधानसभेवर काँग्रेसने दावा केला. आजवर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला संधी मिळाली नाही तरी देखील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देवून समाजाला संधी देण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
काँग्रेसच्या मागे जनमत असल्याचे पाहून अनेक इच्छुक मुंबईच्या वाऱ्या करत काँग्रेसच्या वरिष्ठांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे या इच्छुकांचा जिल्हा पातळीवर काँग्रेस पक्षप्रवेश झाल्याशिवाय वरिष्ठांनी त्यांना संवादाची संधी देवू नये, असा देखील ठराव संमत करण्यात आला. कार्यकारिणी गठित करणे, बुथ कमिटी नेमणे आदीसह पक्षपातळीवरील खाजगी ठराव यावेळी संमत करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, सहसचिव श्याम दरक, प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष जे.पी. पाटील, शमिम अब्दुला, गंगाधर सोंडारे, माजी उपमहापौर मसुद अहेमद खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, अनिल मोरे, श्रीनिवास मोरे, करुणा जमदाडे, संजय भोसीकर, शरद पवार, बालाजी पांडागळे, संभाजी भिलवंडे, केदार पाटील सांळूके, संजय पाटील शेळगावकर, शिवाजी पाटील पाचपिंपळेकर, राजू पाटील रावणगावकर, गिरी पाटील, अजिज कुरेशी, भिमराव जेठे, शिवराज पाटील, तारांकत पाटील, वलियोद्दिन फारुखी, अजय एडके, बापूसाहेब पाटील आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ पवार, अनिल मोरे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर आहेत इच्छुक… कंधार लोहा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ मोरे यांनी गेल्या काही महिन्यापासून तयारी सुरू केली आहे दुसरीकडे काँग्रेसचेच माजी सनदी अधिकारी अनिल मोरे, माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर हेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसच्या पडझडीच्या काळात माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न पहिल्या टप्प्यात केल्या होते. लोकसभा निवडणुकीत त्याला यशही मिळाले. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देण्याचा ठराव घेतल्याने या इच्छुकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचवेळी महाआघाडी कडून अद्याप कोणतेही जागावाटप झाले नसताना काँग्रेसकडून वेगवेगळ्या मतदार संघावर आतापासूनच दावे ठोकले जात आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीत आता जागा वाटपावरून किती धुसफूस रंगणार याकडे लक्ष लागले आहे.