आरोग्य

नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यात आजपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 

मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन घुंगराळा येथे खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

नांदेड –  जिल्ह्यात आज १० फेब्रुवारीपासून किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड या दहा तालुक्यात  हत्तीरोग  दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमचे जिल्हास्तरीय उदघाट्न नायगाव तालुक्यातील घुंगराळा जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी ११ वाजता खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
जिल्ह्यातील उपरोक्त १० तालुक्यातील सर्व गावात हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषधोपचार डोस दिला जाणार आहे. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत डीईसी व अलबेंडाझाल ही औषधे देण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेट देऊन वयोगटानुसार औषध देतील. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नये तसेच दोन वर्षाखालील मुले व गरोदर महिला, गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाही.  १० तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी, वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड व कामगार, दगड क्रेशर मशीनवरील कामगार अति जोखमीच्या भागातील नागरिकांनी  हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.
घुंगराळा येथे आज सोमवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अर्चना भोसले किर्दक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर डॉ. वैशाली तांभाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार, डॉ. श्रीकांत पटवेकर, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक संजय भोसले, सत्यजीत टिप्रेसवार, व्यकटेश पुलकंठवार, हत्तीरोग कर्मचारी मनोहर खानसोळे, नागनाथ राऊलवार,  अंकुश खिलारे, शैलेश मच्छरलावार, भास्कर ढेरे आधी परिश्रम घेत आहेत.

हत्तीरोग हा डासाच्या चाव्याने होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. या रोगाला लिम्फॅटिक फायलेरिसिस ( एल एफ ) असेही म्हणतात. हत्तीरोगामुळे रुग्णाच्या पाय आणि वृषणाचा आकार वाढतो. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायाला खूप जास्त सूज येते. पायाचा आकार बदलतो आणि विद्रूप झालेला दिसून येतो. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणे कठीण होते व दैनंदिन कामकाज करण्यास अडचणी येतात. यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा यांनी सामुदायिक औषधोपचार मोहिमेमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत करावी असे आवाहन हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!