
नांदेड – नांदेड जिल्ह्यात झालेल्या १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) पहिल्या स्थानी राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ जागांसह तीन नगराध्यक्ष पदे जिल्ह्यात मिळवले आहेत. भारतीय जनता पक्ष ६७ नगरसेवक पदांसह तीन नगराध्यक्ष पदे मिळवत दुसऱ्या स्थानी राहिला आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला चार ठिकाणी मतदारांनी थेट नाकारले असून एकही जागा या नगरपरिषदामध्ये काँग्रेसची आली नाही. जिल्ह्यात काँग्रेसला नेतृत्वच नसल्याने आता काँग्रेसचा जिल्ह्यातून सफाया होईल की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटही सात सात नगर परिषदेत आपले खाते उघडू शकला नाही.
जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीचा निकाल आज रविवारी घोषित झाला. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ भाजपाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठवत प्रचार केला होता. महायुती होईल असे वाटत असताना भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढले. यात मुखेड नगर परिषदेत राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आला. त्यात नगराध्यक्ष पदी शिंदे गटाने विजय प्राप्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत ३ ठिकाणी भाजपा, ३ राष्ट्रवादी काँग्रेस, २ काँग्रेस, २ शिवसेना शिंदे, २ मराठवाडा जनहित पार्टी आणि १ ठिकाणी शिवसेना (उबाठा) चे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १५ नगरसेवक निवडून आणले आहेत. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापित झाली आहे. बहुचर्चित लोहा नगरपालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता राखली आहे. येथे भाजपाला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसने १७ नगरसेवक आणि नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचले आहे. भाजपाला या ठिकाणी केवळ एक जागा प्राप्त करता आली आहे. उमरीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. नगराध्यक्ष पदासह १८ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. लोह्याप्रमाणेच या ठिकाणीही भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. कंधार नगर परिषदेत काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला असला तरी या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. कंधार नगर परिषदेत १० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले जिल्ह्यातील खाते उघडले आहे. त्याच वेळी तीन अपक्षही निवडून आले आहेत.
भारतीय जनता पक्षाने मुदखेड, भोकर आणि कुंडलवाडी नगर परिषदेत एक हाती सत्ता राखली आहे. भोकर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह १३ जागा भाजपाला मिळाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन, मराठवाडा जनहित पार्टीने चार आणि अपक्ष तीन निवडून आले आहेत. मुदखेड नगर परिषदेतही भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवकही निवडून आले आहेत. एमआयएमने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे तर राष्ट्रीय काँग्रेसनेही चार नगरसेवक येथे विजयी केले आहेत. कुंडलवाडी नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष तसेच १४ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्षांचे प्रत्येकी दोन नगरसेवक येथे निवडून आले आहेत. मुखेड नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचे १४ नगरसेवक निवडून आले असले तरीही येथे नगराध्यक्ष मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीचा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाला येथे सहा जागाही मिळाल्या आहेत.
धर्माबाद आणि बिलोली नगरपरिषदेत मराठवाडा जनहित पार्टीने आपला जलवा दाखविला आहे. बिलोलीत नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवक विजयी झाले. काँग्रेसला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा येथे मिळाली आहे. धर्माबादमध्ये मराठवाडा जनहित पार्टीचा नगराध्यक्ष आणि १५ नगरसेवक तर भाजपाचे सात नगरसेवक येथे निवडून आले आहेत. हदगाव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पद आपल्याकडे खेचले आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सात, काँग्रेसचे पाच आणि भाजपाचे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत.
किनवट नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगराध्यक्ष पदासह तीन नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे गटाचा एक, भारतीय जनता पक्षाचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाच आणि अपक्ष तीन असे एकूण २० नगरसेवक निवडून आले आहेत. हिमायतनगर नगरपंचायतीत काँग्रेसने नगराध्यक्ष पद मिळवले आहे येथे आठ नगरसेवक पद ही निवडून आले आहेत भारतीय जनता पक्षाने तीन, शिवसेना शिंदे गट दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका जागी येथे विजयी झाला आहे. किनवट आणि हिमायतनगर येथे महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली आहे.
जिल्ह्यात पाच नगरपरिषदांमध्ये काँग्रेसचा तर तीन नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सफाया..! आज आलेल्या निकालामध्ये काँग्रेसचा चार आणि भाजपाचा तीन नगरपरिषदांमधून सफाया झाला आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. काँग्रेस पक्षाचा धर्माबाद, भोकर, मुखेड आणि किनवट नगर परिषदेत एकही नगरसेवक निवडून आला नाही. तर भाजपाला देगलूर, बिलोली आणि कंधार नगर परिषदेत आपले खाते उघडता आले नाही. शिवसेना शिंदे गटही देगलूर, कुंडलवाडी, धर्माबाद, भोकर, बिलोली, लोहा, उमरी आणि मुदखेड नगर परिषदेत आपला एकही नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत



