
नांदेड : जिल्ह्यात सोमवारी दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘ दर्पण ‘ सुरू केले होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असलेल्या ‘ दर्पण ‘ चा वर्धापन दिन ‘ दर्पण दिन ‘ म्हणून साजरा करीत असतो. ६ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ‘ या विषयावर पत्रकारांना संबोधित करणार आहेत.
नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड पोलीस प्रशासन, जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनाच्या पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसोबत प्रशासनाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी’ या विषयावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बातमीदारीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याचे फायदे व तोटे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपस्थित राहणार असून ते देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील विविध संघटनांशी, माध्यम संस्थांशी, केंद्रांशी संबंधित सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम शास्त्र संकुलातही ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ‘डिजिटल युगात पत्रकारितेचे बदलते संदर्भ’ या विषयावर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील डॉ. विश्राम ढोले यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहतील. दुपारी दोन वाजता माध्यम शास्त्र संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमशास्त्र संकुल संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. दीपक शिंदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले यांनी केले आहे.
मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक असलेल्या दैनिक गोदातीर समाचारचा वर्धापन दिन, दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आणि पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन ६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील दैनिक गोदातीर समाचारच्या कार्यालयात होणाऱ्या या सोहळ्यास नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, लोहा – कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, विधानसभेतील शिवसेना गटनेते हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील यांनी केले आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनेही दर्पण दिन…आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘ दर्पण ‘ सुरू केले होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असलेल्या ‘ दर्पण ‘ चा वर्धापन दिन ‘ दर्पण दिन ‘ म्हणून साजरा करीत असतो.६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय पेट्रोल पंपाजवळील दैनिक सत्यप्रभा कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले आहे.