राजकीय

नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा..! 

आगामी काळात नांदेड जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार; माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

नांदेड – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके कसे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर व जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील पक्षच आमने सामने येतील अशीच चिन्ह दिसत आहेत.

भाजपा सदस्य नोंदणीची जिल्हा आढावा बैठक शनिवारी नांदेडमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असे स्पष्ट केले. देशासह राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू.आपली ताकत शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही.
देशात, राज्यात आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत. देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत तर महाराष्ट्राचे नेतृत्व भाजपाने ते देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. देशात सर्वाधिक खासदार भाजपत आहेत भाजपचे आहेत. तर राज्यात सर्वाधिक आमदार भाजपाचे आहेत त्यामुळेच आपली सत्ता दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगर पालिका आणि पंचायत समितीच्या सर्वधिक जागा भाजपच्या निवडून आल्या पाहिजेत, अशा माझ्या सूचना इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आहेत. आगामी काळात सर्व आघाड्यांवर, सर्व मतदारसंघात आपली तयारी असली पाहिजे. तुम्ही म्हणाल तर आपण स्वबळावर निवडणुका लढवू. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे निवडणुका लढवू, पण तयारी करा ऐनवेळी सांगू नका, परिस्थिती प्रमाणे आपण निर्णय घेऊ असे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात भाजपचा बालेकिल्ला हा नांदेड जिल्हाच राहणार असल्याचे ते या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमाला संजय कौडगे, आ.भीमराव केराम, आ.तुषार राठोड, आ. जितेश अंतापूरकर, किशोर देशमुख, संतुक हंबर्डे, चैतन्य देशमुख, देविदास राठोड, प्रवीण साले, किशोर स्वामी, बालाजी बच्चेवार, सचिन उमरेकर, गोविंदराव नागेलीकर, शीतल खांडील, विजय गंभीरे यांची उपस्थिती होती.

खा. चव्हाणांचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था…माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ दिवसापासून ते नांदेडमध्ये वेगवेगळ्या घटकांशी निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा करत आहेत, सूचना देत आहेत. काही दिवसापूर्वी नांदेड शहरातील माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांनी शहरातील प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत आगामी काळात निवडणुकांच्या दृष्टीने काय करता येईल याची चाचपणी केली. माजी नगरसेवकांना कामाला लागण्याचे संदेशही दिले आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका संदर्भातही त्यांनी आता जिल्हाभर दौरे सुरू केले आहेत. त्यातही कंधार, लोहा हे दोन तालुके विशेष लक्ष्य राहणार आहे. हे गेल्या आठवड्यातील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी कंधारमध्ये होणारा पक्षप्रवेश सोहळाही याची नांदीच ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!