
नांदेड – बीडचा बिहार झाला असला तरी नांदेडचा मात्र बीड होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा देत सकल मराठा समाजाने नांदेडचे पालकमंत्री पद मुंडे बंधू भगिनींना देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याचवेळी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तपासाला मिळालेली गती पाहता नांदेडमध्ये १८ जानेवारी रोजी काढण्यात येणारा सकल मराठा समाजाचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. या खून प्रकरणात अनेक बड्या राजकीय मंडळीची नावे येत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीडसह परभणी, जालना येथे मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. नांदेडमध्येही असाच मोर्चा १८ जानेवारी रोजी काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या ११ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र या प्रकरणाच्या तपासाला गेल्या तीन-चार दिवसात मिळालेली गती पाहता आणि तपास योग्य दिशेने होत आहे. शासनाने आरोपी विरोधात मकोका लावून आरोपींना पोलीस कोठडीत पाठविले असल्याचे पाहून नांदेडच्या सकल मराठा समाजाने मोर्चा सध्या तरी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला दशरथ पा.कपाटे, गोविंद कदम शिर्शीकर, सुनील पाटील कदम, नाना पाटील बेटसांगवीकर, भास्करराव हंबर्डे, सुभाष कोल्हे, दत्ता खराटे, सुधीर देशमुख, नवनाथ जोगदंड, राज सरकार, दत्ता इंगळे, डॉ. बालाजी पेनूरकर आदी समाज बांधव उपस्थित होते. मोर्चा रद्द करण्याच्या या निर्णयानंतर मराठा समाजातील काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री पद मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना दिले जाईल, अशी चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातही सुरू आहे. पालकमंत्री पदाबाबत अधिकृत निवड, घोषणा होण्यापूर्वीच नांदेडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना देण्यास मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शविला आहे. मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांविषयीच्या संतप्त भावना आहेत. त्यामुळे नांदेडचे पालकमंत्री पद या मंत्र्यांना देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर नांदेडचे पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनीला मिळाल्यास त्याचा तीव्र विरोध सकल मराठा समाज करेल. त्यांना येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.