
नांदेड – नांदेड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचा २५ जानेवारी रोजी वासवी माता कन्यका परमेश्वरी भवन, सिडको रोड नवीन नांदेड येथे जिल्हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
शनिवारी दुपारी ४.०० वा. होणाऱ्या या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदार परवाना धारकास ३०० रु. प्रति क्विंटल कमिशन मार्जिन मंजूर करण्यात यावी, जिल्ह्यातील १६ तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा इष्टांक केंद्र शासन तसेच राज्य शासनकडून मंजूर करावा तसेच गेल्या ३ वर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत बंद असलेली डेटा एंट्री तात्काळ सुरु करावी, मयत रास्तभाव धान्य दुकानदारांना वारसा आधारे प्रथम ३ महिन्यात तात्पुरत्या स्वरुपात आणि त्यानंतर न्यायालयाच्या कार्यवाहीनंतर कायमस्वरुपी दुकान मंजूर करण्याबाबत शासन निर्णय असतांनाही ३० ऑगष्ट २०२१ पासून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुसऱ्या दुकानास पर्यायी व्यवस्था लावली जात आहे, असे न करता त्वरीत वारसाआधारे कायमस्वरुपी दुकान मंजूर करावे, जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील नियमित धान्य उचल करणाऱ्या ११ हजार ५९८ लाभार्थ्यांना एप्रिल २०२४ पासून वगळण्यात आले आहे, त्या सर्व लाभार्थ्यांना पूर्ववत धान्याचा लाभ द्यावा या व इतर मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.
या मेळाव्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास जिल्हयातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके यांच्यासह लक्ष्मीकांत गोणे, शाहूराज गायकवाड, अब्दुल सलिम अब्दुल मुनीर, उद्धवसिंह कल्याणकर, अशोक गायकवाड, उपाध्यक्ष बळवंत सुर्यवंशी, अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी, अशोक पटकोटवार, ज्ञानेश्वर उकरंडे, योगेश बारडकर, मोहम्मद मुजाहेद, अब्दुल कलीम अब्दुल सलीम, अब्दुल नदिम अब्दुल सलीम, महमद जुनेद आणि सर्व शहर, तालुका, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.