
नांदेड – गाव पातळीवर लोकांची सेवा करण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करतात. ते दुकानदार म्हणून ओळखले जात असले तरीही गरिबांचा अन्नदाता म्हणून कामे करतात. अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा सुरू आहे. तळागळापर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत असतात. या दुकानदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य आहेच, पाठपुरावाही आहे. आगामी काळातही मंत्रालय स्तरापर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण संघटनेसोबत राहू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी नांदेडमध्ये दिला.
नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा आणि जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार सोहळा सिडको येथील येथील वासवी माता कन्यका परमेश्वरी भवन येथे शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण हे होते. या मेळाव्यास लक्ष्मीकांत गोणे, शाहूराज गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार चव्हाण यांनी शासनाच्या महत्त्वकांशी धान्य वाटप योजनेचे खरे दूत हे स्वस्त धान्य दुकानदारच असल्याचे सांगितले. शासनाकडून दिले जाणारे धान्य त्यामध्ये गहू, तांदूळ, सण उत्सवप्रसंगी आनंदाचा शिधा पोहोचविण्याचे काम ते करतात. कमिशन मिळो अथवा न मिळो काम मात्र सुरूच असते. अन्नदाता म्हणून खरं काम स्वस्त धान्य विक्रेते करत असतात असेही ते म्हणाले. या संघटनेला जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांच्या माध्यमातून आपले प्रारंभीपासूनच सहकार्य आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यासंदर्भात आपण नेहमीच सकारात्मक आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांसंदर्भात शासन दरबारी अनेक पत्रही दिले आहेत. त्याचवेळी माथाडी कामगारांचेही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नातही आपला सहभाग निश्चितपणे राहणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या रास्त आहेत. त्या सुटाव्यात अशी आपली मनापासून भावना आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्न, मागण्या संदर्भात जिल्हास्तरावर एक बैठक घेतली जाईल. या बैठकीनंतर राज्यस्तरावरील प्रश्नावर मंत्रालयात पाठपुरावा केला जाईल. मंत्रालयातही बैठक घेण्यासाठी आपण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाऊ. येत्या पंधरा दिवसात जिल्हास्तरावरील बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मुंबईतील बैठक होईल असेही माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपला निवडणुकीत यश मिळविण्यासाठी चांगला धक्का दिला, आता आम्हीही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘चलो मंत्रालय’ असा नारा देऊ असे ते मिश्कीलपणे म्हणाले.
प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या वेगवेगळ्या समस्या, प्रश्न मांडले. त्यामध्ये प्रामुख्याने रास्त भाव दुकानदार परवानाधारकांना ३०० रुपये प्रति क्विंटल कमिशन मार्जिन मंजूर करावी, जिल्ह्यातील १६ तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा इष्टांक केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून मंजूर करावा, गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत बंद असलेली डेटा एन्ट्री तात्काळ सुरू करावी, मयत रास्त भाव धान्य दुकानदारांना वारसा आधारे प्रथम तीन महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात आणि त्यानंतर न्यायालयाच्या कार्यवाहीनंतर कायमस्वरूपी दुकान मंजूर करण्याबाबतचे तात्काळ आदेश द्यावेत, वारसा आधारे कायमस्वरूपी दुकान मंजूर करावे, नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार परवानाधारक संघटनेच्या जिल्हा कार्यालयासाठी भाडेपट्ट्यावर जिल्हा परिषद, महानगरपालिका क्षेत्रात पाच हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, नांदेड जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रास्त भाव दुकाने निलंबित केले आहेत ती पूर्वत सुरू करावीत, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील नियमित धान्य उचलणाऱ्या ११ हजार ५९८ लाभार्थ्यांना एप्रिल २०२४ पासून वगळण्यात आले आहे. त्या सर्व लाभार्थ्यांची प्राधान्याने डेटा एन्ट्री करून त्यांना पूर्ववत धान्याचा लाभ देण्यात यावा, मराठवाडा आणि विदर्भातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील एपीएल शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना रोख अनुदानाऐवजी धान्य पुरवठा करण्यात यावा, नांदेड जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीमध्ये कोरोना काळात मुदतवाढ दिलेल्या काळात वितरण केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे २ कोटी ७० लाख ८४ हजार १०५ रुपये कमिशन मार्जिन रास्त भाव धान्य दुकानदारांना त्वरित देण्यात यावे यासह इतर मागण्यावर चर्चा केली. हे प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली.
प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनिल कुलकर्णी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन मार्जिन अतिशय तुटपुंजे मिळते ते कमिशन त्वरित वाढवावे, धान्य वाटप करण्यास कमी वेळ मिळतो तो वेळ वाढवून द्यावा तसेच धान्यही कमी मिळत आहे, याकडेही कुलकर्णी यांनी प्रास्ताविकाद्वारे लक्ष वेधले.
या जिल्हा मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके, अब्दुल सलिम अब्दुल मुनीर, उद्धवसिंह कल्याणकार,अशोक गायकवाड, उपाध्यक्ष बळवंत सुर्यवंशी, अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी, अशोक पटकोटवार, ज्ञानेश्वर उकरंडे, योगेश बारडकर, मोहम्मद मुजाहेद, अब्दुल कलीम अब्दुल सलीम, अब्दुल नदिम अब्दुल सलीम, महमद जुनेद, देविदास दगडे, चंद्रमुनी सावंत आणि सर्व शहर, तालुका, जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले.