राजकीय

विधानसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधात पैसे वाटले – नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा आरोप 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने साथ दिली तर ठीक;  अन्यथा शिवसेना शिंदे गटाची भूमिकाही महायुतीच्या विरोधातच राहणार

नांदेड – नांदेडमध्ये महायुतीचे विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी माजी मुखमंत्री,  खासदार अशोकराव चव्हाण यांच्याविरुद्ध उघडपणे विरोधात्मक मोहीम हाती घेतलेली असतानाच आता शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही नांदेडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी आपले काम केले नसल्याचा थेट आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत ५० हजार मताधिक्य अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजार मतांनी आपला विजय झाला आहे. भाजपाने आपल्या विरोधात उघडपणे काम केल्याचे त्यांनी म्हटले आहे.  त्यामुळे नांदेडमध्ये महायुतीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वबळाचा नारा दिला. आता शिवसेना शिंदे गटानेही भाजपाविरुद्ध दंड थोपटल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने भरभरून दिलेल्या आशिर्वादाबद्दल महाविजयाचे शिल्पकार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा नांदेडमध्ये पोहचत आहे. त्यानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये नवीन मोंढा मार्केट कमिटी मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
त्या सभेच्या सभामंडपाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी मंत्री तथा विधान परिषद गटनेते आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमालाताई राठोड, गिताताई पुरोहित आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी महायुतीतील बेबनाव स्पष्टपणे मांडला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजय मिळाला असला तरीही तो विजय केवळ नामधारी असल्याचे स्पष्ट केले.  विधानसभा निवडणुकीत ५० हजाराहून अधिक मताधिक्य अपेक्षित होते;  मात्र ते केवळ साडेतीन हजारावर आले. आपण कसेबसे निवडून आलो;  आपण गेल्या पाच वर्षात रात्रंदिवस जनतेची कामे केली. असे असतानाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आपले काम केले नाही; उलट आपल्याला पाडण्यासाठी अनेक ठिकाणी पैसेही वाटले. विधानसभा निवडणुकीत आपण आपल्या कामाच्या बळावर निवडून आलो. त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या नेत्यांनी साथ दिली तर ठीक आहे, नाहीतर आपणही आपल्या पद्धतीने काम करू, असे आमदार कल्याणकर यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता काम कसे करायचे ही भूमिका आपल्याला ठरवावीच लागणार आहे. त्यांचा स्वबळाचा नारा असेल तर आपणही कमी नाही. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपणही आपली ताकद दाखवून देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीकडे भाजपाकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना आपल्यालाही आता त्याच तोडीचे उत्तर द्यावे लागणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनीही यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेडमध्ये महायुतीतील पक्षच एकमेकांच्या समोर उभे राहतील, असे चित्र नांदेडमध्ये तरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे अजित पवार गटाचे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही राष्ट्रवादीमध्ये जिल्हाभरातून इनकमिंग सुरू केली आहे. वेगवेगळ्या नेत्यांना ते राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या भोकरमध्येही त्यांनी बाळासाहेब रावणगावकर यांच्यासारख्या नेत्याला गळाशी लावले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होतास पक्षांतराचे हे सोहळे वेगवेगळ्या माध्यमातून रंगणार आहेत. त्यातच आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महायुतीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातच मोठी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा ही नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण देणार आहे.

 दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत रस्सीखेचमध्येच अडकली असल्याचे चित्रही स्पष्ट झाले आहे. नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष पद राजेश पावडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केले. मात्र महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ते थांबविण्याचे आदेश दिले. त्यावेळी नांदेडमध्ये तातडीने काँग्रेसकडून नूतन जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. केवळ आपल्या अंतर्गत विरोधातून हा प्रकार घडल्याचे असल्याचे सांगितले. आपल्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. आपली निवड रद्द झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच काँग्रेसमधील ही अंतर्गत रस्सीखेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरणार आहे, हेही निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!