क्राईम

डीआयजींच्या विशेष पथकाच्या लातूर, नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर धाडी..!, ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिस्तूल, २७ मोबाईलसह साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम जप्त, उदगीर तसेच नांदेडमधील इतवारा भागात कारवाई

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यांच्या विशेष पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि नांदेड शहरातील इतवारा भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाडी टाकले आहेत या धाडीमध्ये एक पिस्तूल, २७ मोबाईल तसेच साडेतीन लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाणे हद्दीतील मच्छी मार्केट येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली. या माहितीवरून उमाप यांनी विशेष पथक पाठवत ३० जानेवारी रोजी या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. येथे जुगार खेळणाऱ्या २५ व्यक्तींकडून २ लाख ३४ हजार १०० रुपये आणि ४ लाख २८ हजार रुपयांचे २७ मोबाईल असा ६ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात २५ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच पथकाने इतवारा हद्दीत  जयकिशन उर्फ जय राजेशसिंह ठाकुर वय २१ रा. उल्हासनगर, तरोडा नाका याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतूस असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. त्याच्याविरुद्धही इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांच्या विशेष पथकाने २७ जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक चौकात रमेश गिरी यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत रोख १ लाख ५ हजार २०० रुपये आणि ७० हजार रुपयांचे १२ मोबाईल असा १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात १३ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण ३ लाख ४० हजार रुपये रोख आणि ५ लाख रुपयांचे ३९ मोबाईल तसेच एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस असा एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ कामाजी गवळी, विलास सुरवसे यांनी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १० हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. हे अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते याचाही आता शोध घेण्यात येत आहे. त्यात खात्यातील कोणी आहे का.. याचाही तपास केला जाईल, असे हे स्पष्ट केले.

अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या…आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहा निरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या खबर हेल्पलाइनवर कळवून अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!