
नांदेड – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला आणि महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मतदार आणि लाडक्या बहिणीचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ६ फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आभार सभेसाठी शहरभर बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरवर महायुतीतील मोठा भाऊ म्हणून पुढे आलेल्या भाजपातील राज्यस्तरीय तसेच स्थानिक नेत्यांनाही कोणतेही स्थान मिळाले नाही त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वरून नांदेडमध्ये महायुतीतील रंगलेला वाद आता आगामी काळात कोणते वळण घेईल याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी भाजपाने केलेल्या बॅनरबाजीत मात्र शिवसेना शिंदे गटाला जवळ करण्याचा प्रयत्न करून ‘एकला चलो रे’ च्या आक्रमक भूमिकेनंतर नरमाईची भूमिका घेतल्याचेच स्पष्ट होत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात महायुतीच्या सर्व नऊच्या नऊ जागा निवडून आले आहेत. या निवडणूक निकालानंतर नांदेड जिल्ह्याला एखादे मंत्रीपद मिळावे अशी नांदेडकरांसह महायुतीतील नेत्यांचीही अपेक्षा होती. ही अपेक्षा सार्थही होती. नांदेडमधून मंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेतील आमदार हेमंत पाटील, भारतीय जनता पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजया चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे इच्छुक होते. या तिन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पातळीवरून मंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केली होती; मात्र नांदेड जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळाले नाही. मंत्रीपदासाठी आलेले हे अपयश महायुतीतील नेत्यांच्या अंतर्गत स्पर्धेतूनच आल्याचे पुढे स्पष्ट झाले. त्यामुळे नांदेडमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाकडून मात्र नांदेड जिल्ह्यात महायुतीमध्ये असा कोणताही बेबनाव नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी मंत्रीपदाचा निकाल लागल्यानंतर नांदेड मधील प्रत्येक जाहीर कार्यक्रमात आक्रमक भूमिका घेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या ‘ लक्ष्य ‘ केले आहे. आ. हेमंत पाटील यांच्याकडून खा. अशोकराव चव्हाण यानाच्यवर वारंवार टीका केली जात असताना चव्हाण यांच्या बचावासाठी नांदेडमधील भाजपचे जुने आणि नवे कोणतेही नेते पुढे आले नाहीत, हेही विशेष.
त्याचवेळी भाजपाच्या संघटनात्मक बैठकामध्ये माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. खा. चव्हाण या भूमिकेवरून महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही खा. अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेला विरोध करत चव्हाण हे भाजपाचे नेते आहेत का, युती संदर्भात निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व घडामोडीत भाजपाचे स्थानिक नेते मात्र गप्पच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून नांदेडमध्ये आक्रमक भूमिका घेतली जात असताना भाजपा नेत्यांकडून मात्र मौन बाळगल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यातून शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नांदेडमध्ये एक प्रकारे आपले शक्ती प्रदर्शनच करत आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जनतेचे मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका ठिकाणी यश मिळाले आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडून होणाऱ्या आजच्या नांदेडमधील सभेत महायुतीतील एकाही घटक पक्षाला स्थान दिले नाही. इतकेच नव्हे तर मोठा भाऊ म्हणून पुढे आलेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनाही बॅनरवर स्थान दिले नाही. याउलट भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि नांदेड जिल्हा प्रवक्ते असलेल्या चैतन्य बापू देशमुख यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकत्रित फोटो लावत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ असा संदेश देणारे बॅनर नांदेड शहरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावले आहेत. एकीकडे शिवसेनेने भाजपाच्या राज्य आणि स्थानिक स्तरावरील नेत्यांना डावलले असले तरी भाजपाने मात्र महायुती धर्म पाळण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी आक्रमक भूमिका घेत माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले आहेत महायुतीचे काम न करता शिवसेनेचा उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पैसे वाटल्याचा थेट आरोपही केला आहे. इतकेच नव्हे तर भाजपाचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हजार चव्हाणांच्या भूमिकेबाबत गाऱ्हाणे मांडले आहे.
एकूणच नांदेडमध्ये शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेपुढे भाजपाकडून मात्र नांगी टाकल्याचेच दिसत आहे. एकीकडे अशोकराव चव्हाण हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच पार्श्वभूमीवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून मात्र शिंदेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर लावून ‘ ही दोस्ती तुटायची नाही’ असा संदेश देत त्यांच्या भूमिकेला एक प्रकारे छेदच देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच अशी सारवासारव करण्याचे काही निर्देश आले आहेत की काय असा सवालही केला जात आहे. त्यामुळे शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून आता नेमका कोणता संदेश दिला जाईल याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.