
नांदेड – विष्णुपुरी येथील काळेश्वर येथे पोहण्यास गेलेल्या कंधार येथील एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.
कंधार येथील कासिम पि. शादुल शेख (रा. हळदा ता. कंधार) नामक युवक हा ऑटो चालवितो. तो आज ३० एप्रिल रोजी कंधारहून एका कुटुंबीयाला विष्णुपुरी येथील काळेश्वर येथे अस्थि विसर्जनासाठी घेऊन आला होता. सकाळी अकराच्या सुमारास ते काळेश्वर येथे पोहोचले. सदर कुटुंब हे अस्थिविसर्जनाचा विधी पार पाडत असताना वाढत्या तापमानामुळे ऑटोचालक कासिम हा काळेश्वर येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरला. मात्र तो पोहताना बुडाला. ही बाब समजताच काळेश्र्वर मंदिर व्यवस्थापनातील काही लोकांनी गोदावरी जीवरक्षक दलास पाचारण केले. गोदावरी जीवरक्षक दलाचे सय्यद नूर यांच्या मार्गदर्शनाखाली कालिदास, सुदाम खिल्लारे, शेख अखिल शेख रजाक, शेख हब्बू शेख अकीब, शेख वसीम शेख गफार आदी जीव रक्षक दलाच्या सदस्यांनी कासिमचा मृतदेह गोदावरी नदीतून बाहेर काढला. याबाबत नांदेड ग्रामीण ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.