महापालिका

प्रशासकीय कालावधीतही नांदेडकरांवर कोणत्याही कर वाढीचा बोजा नाही… नांदेडमध्ये होणार संविधान भवन..!

प्रशासक तथा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी महापालिकेच्या १ हजार ५२३ कोटींच्या अर्थसंकल्पास दिली मंजुरी, शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा संकल्प

नांदेड – नांदेड महापालिकेच्या कोणत्याही करवाढ नसलेल्या १ हजार ५२३ कोटींच्या अर्थसंकल्पास महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. शहरात दररोज पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन कक्ष, त्यासोबतच महापालिकेच्या प्रत्येक क्षत्रिय कार्यालयामध्ये उद्यान विकसित करणे यासोबतच नांदेडमध्ये संविधान भवन उभारण्याची घोषणा महापालिकेच्या या अर्थसंकल्पात आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी केली आहे.
महापालिकेत डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष बैठकीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रशासकीय कालावधीतील तिसरा अर्थसंकल्प सादर केला २०२४- २५ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक १ हजार ७१२ कोटी रुपयांचे होते. त्यात विविध विभागांनी सुचवल्यानुसार २०७ कोटींची कपात करून सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक या विशेष सभेत सादर करण्यात आले. हे अंदाजपत्रक १ हजार ५०५ कोटींचे होते. या अंदाजपत्रकास मंजुरी देताना २०२५- २६ करिता महापालिकेचे प्रस्तावित एकूण उत्पन्न १ हजार ५२३  कोटी रुपये राहणार आहे. त्यात विविध विभागांनी प्रस्तावित केलेला एकूण खर्च हा १ हजार ५१७ कोटी रुपये इतका आहे. नांदेड महापालिकेचे सन २०२५- २६ ची महसुली जमा ६४५ कोटी रुपये असून एकूण महसुली उत्पन्नातून होणारा खर्च ६६४ कोटी रुपये राहणार आहे. महसुली आणि भांडवली लेखाशीर्ष यांच्या जमा खर्चाचा रकमांचा तपशीलासह ५ लाख ८५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे.
२०२५- २६ च्या अर्थसंकल्पातील उल्लेखनीय बाबींबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सांगितले, नांदेडकरांना आगामी वर्षातही मालमत्ता करातील सवलतींचा लाभ मिळणार आहे. शहराला लवकरच दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. सध्या अमृत 2.0 अंतर्गत पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाची कामे सुरू आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महापालिका कौठा भागातील रवीनगर परिसरात 24 × 7  पाणीपुरवठ्याचा प्रयोग करणार आहे. त्याचवेळी किवळा साठवण तलावातील पाणी नांदेड दक्षिणला पुरवण्यात येईल. या किवळा साठवण तलावावर तरंगते पंप हाऊस तयार करण्याचा संकल्पही महापालिकेने केला आहे. गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता नियंत्रणात राहील, यासाठी खबरदारी घेतली जाईल. नांदेड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन कक्ष निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचवेळी पुण्याच्या केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या सहकार्याने नांदेडमधील वाहतुकीचा शास्त्रशुद्ध अभ्यासही केला जाईल. शहरात नवीन सिग्नल उभारण्यात येतील. त्याचवेळी नांदेड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करणारे प्रमुख राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर स्वागत कमान उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शहरात डिजिटल लायब्ररीही उभारण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा संकल्प  करण्यात आला आहे.
नवीन नांदेडातील साई मंगल कार्यालयाच्या नूतनीकरणासह क्रीडा संकुल आगामी वर्षात उभारण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी सिडको भागात जलतरणिका आणि नवीन उद्यान विकसित करण्यासाठीही महापालिका प्रयत्न करणार आहे. नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार झाल्याने नांदेडमध्ये प्रथम दर्जाचे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये प्रामुख्याने रणजी क्रिकेट सामना तसेच आयपीएल आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील सामने घेण्याबाबतही तयारी केली जात आहे. महापालिकेने यंदा प्रथमच असदवान येथील टेकडीवर वनोद्यान तयार करण्यासदर्भातही घोषणा केली आहे. यातून सिडको हडको भागातील नागरिकांना निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यानाचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे.
शहरात आगामी काळात घनकचरा व्यवस्थापनावर येणारा ताण लक्षात घेता नांदेड उत्तरसाठी स्वतंत्र घनकचरा प्रकल्प तयार करण्यात येईल, अशी घोषणाही आयुक्तांनी केली आहे. नांदेड महापालिकेचे प्रशासन गतिमान करणे पारदर्शक करणे यासाठी एनआयसीच्या सहकार्याने ई ऑफिस प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कायद्यांतर्गत येणाऱ्या विविध सेवा सुविधाही ऑनलाईन करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या कामांना गती देण्यात येईल. त्याचवेळी महापालिका प्रशासनाचे बळकटीकरण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय अशोकनगर, इतवारा, वजीराबाद आणि सिडको या क्षेत्रीय कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचवेळी महापालिका हद्दीत नवीन रस्ते, नवीन नाली बांधकाम, नवीन भूमिगत गटार, यासह दिव्यांग, महिला, शिक्षण, सामाजिक विकास, पशुसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या इतर आवश्यक सेवा सुविधा यासाठीही महापालिकेने पुरेशी आर्थिक तरतूद  केल्याचे महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे. या अर्थसंकल्पीय विशेष सभेस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, लेखाधिकारी जनार्दन पक्वान्ने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड शहरामध्ये संविधान भवन उभारण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संविधानाची ओळख करून देणे, संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्यांबाबत नागरिकांना जागरूक करणे यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्चून हे संविधान उभारण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!