महापालिका

नांदेड महापालिकेच्या लोक अदालतीमध्ये ३ कोटी २१ लाख रुपये पाणीपट्टी, मालमत्ता करापोटी वसूल

शहरातील २ हजार ३०३ मालमत्ताधारकांनी भरला मालमत्ता आणि पाणीपट्टी कर, वेळेत कर भरून अप्रिय कारवाई टाळण्याचे महापालिकेचे आवाहन

नांदेड –  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत मुख्य प्रशासकीय इमारतीत शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीत २ हजार ३०३ मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ताकर आणि पाणीपट्टी महापालिकेस अदा केली. यातून महापालिकेला एकाच दिवशी ३ कोटी २१ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या अनुषंगाने शहरातील मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्ताकराविषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याकरीता सूचित करून मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत महापालिकेकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत ३ कोटी २१ लाख रुपये पाणीपट्टी आणि मालमत्ता करापोटी महापालिकेस अदा केले आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत जे मनपा मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस वाटप करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. जवळपास १० हजार मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीसीचे वाटप करण्यात आले होते.
आज  शनिवारी सकाळी १०.३० वा. लोक अदालतीस प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी झालेल्या मालमत्ताधारकांना मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पॅनल प्रमुख न्यायाधीश एन.व्ही. पवार यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या. यावेळी मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसन केले. शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १८२६ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सुट योजनेचा लाभ घेवून एकूण २ कोटी ६२ लाख १६ हजार २९८ रुपये  मालमत्ता कर आणि ४७७ मालमत्ताधारकांनी रुपये ५९ लाख ४३ हजार ५९० रुपये एवढा पाणीपट्टी कर असा एकूण  २ हजार ३०३ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर एकूण ३ कोटी २१ लाख ५९ हजार ८८८ रुपये भरणा केला आहे. ज्या मालमत्ता धारकांनी मनपा मालमत्ताकराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे यासारख्या अप्रिय कारवाई टाळाव्यात, असे आवाहन मनपा आयुक्त  डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.

राष्ट्रीय लोक अदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील जी. वेदपाठक, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचिव विधी सेवा प्राधिकरण श्रीमती दलजीत कौर मनीपालसिंह जज,  पॅनल प्रमुख न्यायाधीश  एन. व्ही.पवार, ८ वे सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, नांदेड, ॲड. डी. एस. कदम, अति. आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त (कर) अजीतपालसिंघ संधू, श्रीमती मनिषा नरसाळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्लाह बेग,  रमेश चवरे,  रावण सोनसळे,  गौतम कवडे,  निलावती डावरे, राजेश जाधव, न्यायालयीन कर्मचारी एन.बी. उपक्रम, एम.पी. सावरकर, महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली अधिकारी, वसुली लिपीक व त्यांचे सहायक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!