
नांदेड – शहरातील मालमत्ताधारकांचा ८० टक्के शास्ती माफी योजनेस सकारात्मक प्रतिसाद पाहता महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिनांक ३१ मार्चपर्यंत ८० टक्के शास्ती माफी योजनेस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता धारकांना पाणी कर आणि मालमत्ता कराच्या थकबाकीवरील ८० टक्के शास्ती माफीचा लाभ अद्यापही घेता येणार आहे.
शहरातील करदात्यांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीची शास्तीसह मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मार्चअखेर थकबाकीची तब्बल ४७९ कोटी रुपये ज्यामध्ये २६५.८२ कोटी रुपये पाणीकरापोटी तर २१३.१९ कोटी रुपये मालमत्ता करायचे थकीत आहेत. महापालिकेने सन २०२५- २६ करिता कर निर्धारण व कर मूल्यांकन विभागाला एकत्रित मालमत्ता कराचे १५०.८७ कोटी व पाणीपट्टीचे ६१.७० कोटींचे महसुली जमेचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
महापालिकेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून २२ मार्च रोजी घेतलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत १ हजार ९४१ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सूट योजनेचा लाभ घेवून ३ कोटी १३ लाख ९ हजार ९८९ रुपये मालमत्ता कर व ५०७ मालमत्ताधारकांनी रुपये ६२ लाख ९८ हजार ७८२ रुपये एवढा पाणीपट्टी कर असा २ हजार ४४८ मालमत्ताधारकांनी ३ कोटी ७६ लाख ८ हजार ७७१ रुपये भरणा केला आहे.
शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी अजुनही मनपा मालमत्ता कर व पाणी कराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या कार्यवाही टाळाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे. थकीत मालमत्ता धारकांसाठी महापालिकेने ८० टक्के शास्ती माफी योजना ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता धारकांना आपला थकित कर वेळेत भरता याव यासाठी महापालिकेचे सर्व सहा क्षेत्रीय कार्यालय २९, ३० व ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. थकीत मालमत्ता धारकांनी शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.