
नांदेड – नांदेड रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यानच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाचे तात्पुरत्या स्वरूपात कौठा भागातील मामा चौक कौठा मोदी ग्राउंड येथे १२ एप्रिलपासून स्थलांतर करण्यात येणार आहे. नांदेड बस स्थानकाच्या या तात्पुरत्या स्थलांतरणांमुळे नांदेड बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या बस फेऱ्यांच्या वाहतूक मार्गात, किलोमीटरमध्ये तसेच टप्प्यामध्येही बदल करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन विभागाच्या नांदेड विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतरित करण्यासंदर्भात नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ पासूनच हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र जागेअभावी हे स्थलांतर रखडले होते. नांदेड शहरातील अबचलनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानकाचे स्थलांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर एक विशेष समिती गठित करून बस स्थानकाच्या तात्पुरत्या स्थलांतरणासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू होता. तो शोध अखेर पूर्ण झाला आहे आणि आता नांदेड मध्यवर्ती बसस्थानक नवीन कौठा भागातील मोदी ग्राउंडवर स्थलांतरित केले जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
बसस्थानक ते रेल्वे स्टेशन या अंतरातील रस्त्याचे काम करण्यासाठी नांदेड मध्यवर्ती बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरणाबाबत नांदेड जिल्हाधिकारी २९ नोव्हेंबर २०२४ आणि २२ जानेवारी २०२५ रोजी बैठका घेतल्या होत्या. याबाबतीत राज्य परिवहन महामंडळास आणि शासनाच्या संबंधित विभागास बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या स्थलांतरणासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी १२ मार्च २०२५ रोजी मध्यवर्ती बस स्थानकात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचवेळी नांदेड मध्यवर्ती बसस्थानक १२ एप्रिल २०२५ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कौठा ग्राउंड अर्थात मोदी ग्राउंड या ठिकाणी बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याबाबत आदेश दिले आहेत.
या तात्पुरत्या स्थलांतरणांमुळे राज्य परिवहन विभागाच्या नांदेड आगाराच्या बसना इंधन भरणे व दैनंदिन वाहन देखभालीसाठी होळकर चौक, खडकपुरा मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूने आत येण्यासाठी आणि डॉक्टर लेनच्या पहिल्या गल्लीतून बाहेर जाण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड बस स्थानक ते नवीन कौठा बस स्थानक या मार्गावर कोणतीही प्रवासी वाहतूक करू नये, असेही आदेशित करण्यात आले आहे.
नवीन बस स्थानक मामा चौक कौठा, नांदेड येथे प्रवाशी निवारा, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवाशांसाठी शौचालय, स्नानगृह, मुक्कामी बसच्या चालक वाहकांसाठी विश्रांतीगृह, शौचालय व स्नानगृह आदी आवश्यक बाबींची जिल्हा प्रशासनाकडून उपलब्धता करून देण्यात येणार आहे.
नांदेड बसस्थानकाच्या स्थलांतरणांमळे नांदेड बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या फेऱ्यांच्या वाहतूक मार्गात, किलोमीटरमध्ये तसेच टप्प्यामध्येही बदल करण्यात येणार आहे. लोहा सोनखेड या मार्गे येणाऱ्या बस डॉ. आंबेडकर चौक, नांदेड स्क्वेअर मॉल, मामा चौक आणि नवीन कौठा बस स्थानक येथे पोहोचतील. त्यामुळे अंतरात एका टप्प्याने घट झाली आहे. नरसी, मारतळा या मार्गावरून येणाऱ्या बस लातूर फाटा, दुध डेअरी, डॉ. आंबेडकर चौक, नांदेड स्क्वेअर मॉल, मामा चौक, नवीन कौठा मार्गे बस स्थानकात पोहोचावे. वसमत, भोकर, वारंगा या मार्गाने येणाऱ्या बस बाफना टी पॉइट, वाजेगाव, लातूर फाटा, डेअरी, डॉ. आंबेडकर चौक, नांदेड स्क्वेअर मॉल, मामा चौक नवीन कौठा मार्गे बस स्थानकात पोहोचतील. या मार्गावरून येणाऱ्या बसच्या अंतरामध्ये ९.५ किलोमीटरची तर १.५ टप्प्याची वाढ झाली आहे. मुदखेड, आमदुरा या रस्त्यावरून येणाऱ्या बस वाजेगाव, लातूर फाटा, डेअरी, डॉ. आंबेडकर चौक, नांदेड स्क्वेअर मॉल, मामा चौक, नवीन कौठा मार्गे बस स्थानकात पोहोचतील. या रस्त्यावरून येणाऱ्या बसच्या अंतरातही १.९ किलोमीटरची तसेच अर्ध्या टप्प्याची वाढ आहे. नाळेश्वर, सुगाव येथून येणाऱ्या बस मील कॉर्नर, मध्यवर्ती कारागृहाच्या बाजूने आगारात येतील. या मार्गावरील बसच्या अंतरात कोणतीही वाढ अथवा घट झाली नाही. किवळा रस्त्यावरून येणाऱ्या बस डेअरी, डॉ. आंबेडकर चौक, नांदेड स्क्वेअर मॉल, मामा चौक, नवीन कौठा मार्गे बस स्थानकात पोहोचतील. अंतरामध्ये ३.७ किलोमीटरने घट झाली आहे. अर्ध्या टप्प्याची घटही नोंदविण्यात येणार आहे. वाहकाने हे सुधारित टप्पा दर पत्रक इटीआय मशीनमध्ये अद्यावत करण्याबाबत विभागीय कार्यालयाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या नव्या बदलानुसार १२ एप्रिल २०२५ पासून मामा चौक, कौठा बस स्थानक येथून प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.