
नांदेड – श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील कोकण प्रदेश प्रथमच थेट रेल्वेसेवेने जोडला जाणार आहे.
ही विशेष रेल्वेसेवा गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नांदेड, परभणी, लातूर, परिसरासह मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाडी क्र. 07659 नांदेड–सावंतवाडी रोड ही विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड येथून १२ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि अनुक्रमे पुढील दिवशी सावंतवाडी रोड येथे पहाटे ३:३० वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्र. 07660 सावंतवाडी रोड–हुजूर साहिब नांदेड ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून १४ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि अनुक्रमे पुढील दिवशी हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.
ही विशेष रेल्वेगाडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक महत्त्वाच्या शहरांना व पर्यटनस्थळांना जोडणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांना रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसह कोकणातील विविध भागात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे. या गाडीला पूर्णा जं., परभणी जं., परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.ही विशेष रेल्वेगाडी एकूण २४ डब्यांची आहे.
गणपती उत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता ही विशेष रेल्वेसेवा मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या थेट रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान गाड्या बदलण्याची आवश्यकता कमी होऊन अधिक सोयीस्कर, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या विशेष सेवेचा लाभ नांदेड, परभणी, लातूर आणि मराठवाड्यातील इतर भागांतील प्रवाशांना घेता येणार असून, गणपती उत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही रेल्वेसेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे.



