
नांदेड – स्वतःला दोन मुली असतानाही आपल्याला मुलगा हवा ही इच्छा मनात बाळगून एका दीड वर्षीय मुलाचे शहरातील पीरबुऱ्हाण नगर येथून अपहरण करणाऱ्या दोघाजणांना भाग्यनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद करून एक चांगली कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि शहर उपविभागीय अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
भाग्यनगर ठाणे हद्दीतून पीरबुऱ्हानगरातील गल्ली क्रमांक १२ येथून ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नुरी चौक येथील रहिवासी असलेल्या दांपत्याच्या दीड वर्षीय बाळाचे दुचाकीवरून दोघा जणांनी अपहरण केले. या घटनेची माहिती नुरी चौक येथील महिलेने भाग्यनगर पोलिसांना ६ ऑक्टोबर रोजी दिली. ही माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून त्या दोन अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी रवाना केले. या तपास पथकाने शहरातील सीसीटीव्हीचा मागोवा घेत बाळाचा शोध सुरू केला. पोलिसांच्या गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती घेतली असता अपहरण केलेले दीड वर्षाचे बाळ खडकपूरा भागात सैलाबनगर येथे दोघेजण घेवून गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विशेष पथकाने तात्काळ सैलाबनगर, खडकपूरा येथे जावून सापळा रचला. तेथे अपहरणकर्ते दोन तरुण आणि बालकास ताब्यात घेतले. या दीड वर्षीय बाळाचे अपहरण मोहम्मद अमिर मोहम्मद अफसर, वय २२ वर्षे, रा. खुदबेनगर देगलूर नाका आणि मोहम्मद इस्माईल अब्दुल हमीद, वय २१ वर्षे, रा. खुदबईनगर देगलूर नाका या दोघांनी केले होते. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करून अपहरणासाठी वापरलेली एमएच-२६ सीक्यू/९८४१ ही दुचाकी जप्त केली आहे.
पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणात तपासाची सूत्र वेगाने हलवत अपहरण झालेल्या बाळास केवळ २४ तासांच्या आत आई-वडिलांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी सपोनि बालाजी महाजन, पोउपनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, संकेत सौराते, सचिन सोनवने, पोहेकॉ गजानन किडे, विलास माळवे, पोकॉ चाबुके, लाटकर, पांचाळ, मुंडे, पठाण यांनी केली. कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड शहरासह लोह्यातही केला होता मूल पळवण्याचा प्रयत्न प्रयत्न..! या प्रकरणातील एका आरोपीला दोन मुली आहेत. त्याला आपल्याला मुलगा हवा ही मनोमन इच्छा होती. यासाठी त्याने दुसऱ्याचेच मूल पळवायचे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या कामासाठी त्याने आपल्या मित्राचीही मदत घेतली. गेल्या काही दिवसापासून त्याने नांदेड शहरातील विविध भागासह लोहा येथेही मूल पळविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. ५ ऑक्टोबर रोजी पीरबुऱ्हानगर येथून या दीड वर्षीय बालकाचे त्याने अपहरण केले; मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा हा डाव फसला आहे. मात्र मुलाचा हव्यास हा समाजातील व्यक्तीला कोणत्या थराला घेऊन जातो, ही बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे. नांदेड पोलीस या प्रकरणाच्या तपासात आणखी काही धागेद्वारे आहेत का याचाही तपास लवकरच लावतील हेही निश्चित.



