
नांदेड – नांदेड शहरातील गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. शहरातील साठे चौकातील तीन मुले पोहण्यासाठी गेले होते. यातील तिसरा मुलगा सुखरूप असल्याची बाबही पुढे आली आहे.
नांदेड शहरातील तुकामाई हॉस्पिटल समोरील साठे चौक परिसरातील तिघे मुले गोदावरी नदीमध्ये नगीनाघाट परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यातील दोन मुले पोहण्यासाठी गोदावरी नदीत उतरले तर तिसरा मुलगा हा गोदावरी नदीकाठी थांबला होता. पोहण्यासाठी उतरलेले दोन्ही मुले पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेत मरण पावलेल्या मुलांची नावे रणवीर यशवंत शिंगाडे (वय १४ वर्षे) आणि गणेश डोंगरे (वय १३ वर्षे) अशी आहेत.
या घटनेप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.



