
नांदेड – नांदेडमध्ये रविवारी झालेल्या दोन अपघातात दोघांचा बळी गेला आहे. यामध्ये दुपारी आसना पुलाजवळ झालेल्या अपघातात वसमत पंचायत समितीचे माजी सभापती तसेच परभणी मध्यवर्ती जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश शेषराव ढोणे यांचा दुचाकी स्लिप झाल्याने मृत्यू झाला. तर दुसरा अपघातही राष्ट्रीय महामार्गावर कामठा पुलाजवळ घडला. यामध्ये एका अज्ञात वाहनाने अनोळखी व्यक्तीला उडवले त्यात तो जागीच ठार झाला.

पूर्णा तालुक्यातील पांगरा येथे राहणारे माजी सभापती प्रकाश शेषराव ढोणे पाटील हे दुचाकीने नांदेड कडे येत होते. त्यावेळी दुपारी आसना पुलावरून खाली उतरताना त्यांची दुचाकी स्लीप झाली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ढोणे हे वसमतचे आमदार राजू नवघरे हे यांचे मामा असल्याची माहितीही पुढे आली आहे.
दुसरा अपघात राष्ट्रीय महामार्गावरच कामठा पुलाजवळ घडला. एका अनोळखी आणि वेडसर व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत तो इसम जागीच ठार झाला घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला फोन लावून त्या व्यक्तीस शासकीय रुग्णालयात हलवले आहे.
एकाच दिवशी काही अंतरावरच राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात झाले आणि यात दोघांचा बळी गेला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी आता निश्चितपणे वाहन चालकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग, लेनचे पालन, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी या सर्व बाबींची माहिती आता जनतेमध्ये पोहोचविणे आवश्यक झाले आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गाकडून अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाकडून यासंदर्भात वेळीच पाऊले उचललेली नाही तर अशा अपघातातून बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढेल हे मात्र निश्चित.



