
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी पुढे आली आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा ४ टक्के मतदान कमी झाले आहे. जिल्ह्यात एकूण ६०.९४ टक्के मतदान झाले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार १८ लक्ष ५१ हजार ८४३ यापैकी ११ लक्ष २८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले. २० तृतीयपंथीयानी मतदान केले.
भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त आकडेवारीनुसार नांदेड मतदारसंघामधील मतदानाची टक्केवारी ६०.९४ टक्के आहे. सर्वाधिक मतदान भोकर विधानसभा क्षेत्रात झाले असून सर्वात कमी मतदान मुखेड विधानसभा क्षेत्रात झाले आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या उपक्रमांना प्रतिसाद ही चांगला मिळाला होता. मात्र अंतिम टक्केवारी पाहता गतवर्षीच्या तुलनेत मतदानात चार टक्क्यांची घट झाली आहे. नांदेड शहरी भागात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे तर ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे मतदान जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शहरी भागातील अनेक युवक शिक्षण, रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर गेले आहेत. तर ग्रामीण भागातही अनेक नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून शहराकडे गेले आहेत. अशा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मुखेड तालुक्यात सर्वात कमी मतदान होण्यासाठी स्थलांतर हे मोठे कारण ठरले आहे. या भागात मोठा कोणताही उद्योग नसल्याने वर्षानुवर्ष दिवाळीनंतर या भागातून सातत्याने रोजगारासाठी स्थलांतर होत असते. हे स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून झाले असते तर हे चित्र बदलले असते. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकातही या स्थलांतरित मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी राजकीय पक्ष, उमेदवार घेत असतात मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मतदार स्वतःहून मतदानासाठी गावाकडे येत नाहीत
नांदेड लोकसभा मतदारसंघातील भोकर विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ४०९ होते. यापैकी १ लक्ष ९२ हजार ४४६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार १ लक्ष ३ हजार ८१२, स्त्री मतदार ८८ हजार ६३३ व तृतीयपंथीयांची संख्या १ आहे. एकूण टक्केवारी ६५.३७ अशी आहे.
नांदेड उत्तरमध्ये एकूण मतदार ३ लक्ष ४६ हजार ८८६ होते. यापैकी २ लक्ष ३ हजार ४२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार १ लक्ष ८ हजार ५९१, स्त्री मतदार ९४ हजार ४४० व तृतीयपंथीयांची संख्या ११ आहे. एकूण टक्केवारी ५८.५३ अशी आहे.
नांदेड दक्षिणमध्ये एकूण मतदार ३ लक्ष ८ हजार ७९० होते. यापैकी १ लक्ष ८६ हजार १५७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार १ लक्ष ३५७, स्त्री मतदार ८५ हजार ७९९ व तृतीयपंथीयांची संख्या १ आहे. एकूण टक्केवारी ६०.२९ टक्के अशी आहे.
नायगावमध्ये एकूण मतदार ३ लक्ष १ हजार २९९ यापैकी १ लक्ष ९६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार १ लक्ष ५ हजार ७२५ स्त्री मतदार ९१ हजार ९१ व तृतीयपंथीची संख्या २ आहे. एकूण टक्केवारी ६५.३२ अशी आहे.
देगलूरमध्ये एकूण मतदार ३ लक्ष ३ हजार ९४३ होते. यापैकी १ लक्ष ८१ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार ९७ हजार ४०३, स्त्री मतदार ८४ हजार ३९८ व तृतीयपंथीयांची संख्या ५ आहे. एकूण टक्केवारी ५९.८२ टक्के अशी आहे.
मुखेडमध्ये एकूण मतदार २ लक्ष ९६ हजार ५१६ यापैकी १ लक्ष ६८ हजार ३०१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार ९० हजार ६००, स्त्री मतदार ७७ हजार ७०१ व तृतीयपंथीयांची संख्या शून्य. एकूण टक्केवारी ५६.७६ टक्के अशी आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार १८ लक्ष ५१ हजार ८४३ यापैकी ११ लक्ष २८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार ६ लक्ष ६ हजार ४८८, स्त्री मतदार ५ लक्ष २२ हजार ६२ व तृतीयपंथीयांची संख्या २० आहे. मतदानाची एकूण टक्केवारी ६०.९४ अशी आहे.
घटलेल्या मतदानामुळे कुणाचे नुकसान..! नांदेड लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात ४ मतदान घटले आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेतील घटलेले हे ४ टक्के मतदान कोणाचे नुकसान करणार आहे याकडे लक्ष लागले आहे. २०१९ मध्ये भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विजयाची लीड ही ४० हजार मतांची होती. यंदा मतदान कमी झाले आहे. त्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात थेट लढत झाली आहे. त्यामुळे घटलेल्या मतांचा फटका आता सत्ताधाऱ्यांनाच बसत असल्याचे चित्र आहे.