
नांदेड – भल्या पहाटे गुलाबी थंडीत गुरुवारी नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या पथकाने वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. अवैध वाळू उपसा करणारे ४ इंजिन आणि २० तराफे पकडून जिलेटीनच्या स्फोटाने ते नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईने पुन्हा एकदा वाळू माफीयांचे कंबरडे मोडले आहे. नांदेड जिल्हा पोलिसांसमवेत आता महसूलचे अधिकारीही मैदानात उतरल्याने वाळूमाफियांना पळता भुई थोडी झाली आहे; परंतु अजूनही अनेक ठिकाणी वाळूमाफिया स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यरत असल्याचे चित्र आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी सुनील मचेवाड, मोहसीन सय्यद, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, गिरी, मुंगल, जमदाडे, सकवान, महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांचा समावेश असलेले महसूल पथक वाहेगाव परिसरामध्ये पहाटे ५ वाजता पोहोचले. यावेळी चार इंजिनद्वारे अवैध वाळू उपसा सुरू होता. पथकाने मजुरांच्या सहाय्याने चार इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. २० तराफेही जाळून नष्ट करण्यात आले. असा एकूण २४ लाख किमतीचा मुद्देमाल जागेवरच स्फोट करून व तराफे जाळून नष्ट करण्यात आला.
नांदेड तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक केल्यास यापेक्षाही कडक कारवाई करून संबंधितावर गुन्हा दाखल करून वेळप्रसंगी एमपीडीए अर्थात संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.



