
नांदेड – नवीन नांदेड येथील धनगरवाडी येथील गुरुगोविंदसिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंगमधील पुनीत विनोद वाटकर या विद्यार्थ्याने गोदावरी नदीत उडी मारून केलेल्या आत्महत्या प्रकरणी त्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य आणि शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनगरवाडी येथील गुरुगोविंद सिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे पुनीत वाटकर आणि त्याची बहीण श्वेता विनोद वाटकर हे दोघे नर्सिंगचा कोर्स करत होते. तीन वर्षापासून ते या कॉलेजमध्ये शिकत होते. पुनीत वाटकर याची चालू वर्षाची स्कूल फीस आणि डोनेशन असे एकूण ३७ हजार रुपये शिल्लक होते. पुनीतने फीस भरली नसल्याने शिक्षिका महादेवी कोरे आणि प्राचार्य श्रीकांत बारटक्के हे त्याला वर्गातून बाहेर काढत होते. त्याने दिलेल्या असाइनमेंटवर सही पण करत नव्हते आणि इंटरनल मार्क देणार नाहीत याबाबत त्याला नेहमी सांगितले जात होते. यामुळे आपले एक वर्ष वाया जाईल या चिंतेत पुनीत हा होता.
याच चिंतेतून १२ मे रोजी पुनीत वाटकर हा धनगरवाडी येथील रूमवरून सायंकाळी साडेसहा वाजता निघाला. वाडी पाटीपर्यंत जाऊन येतो म्हणून तो घराबाहेर पडला होता. परंतु बराच वेळ आला नसल्याने त्याची बहीण श्वेताने मावस भाऊ प्रज्वल चंद्रशेखर कडूकार यास फोनवर सांगितले, तू पुनीतला बोल. तेव्हा प्रज्वल याने पुनीतला फोन केला असता प्रज्वलने सांगितले की माझा फॉर्म भरला नाही त्यामुळे माझे एक वर्ष वाया जाते. माझी फीस भरली नसल्याने माझे वर्ग शिक्षक आणि प्राचार्याकडून खूप त्रास होत आहे आणि याच टेन्शनमध्ये मी असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी प्रज्वलने त्यास समजावून सांगितले की टेन्शन घेऊ नको. मात्र त्या दिवशी पुनीत हा उशिरापर्यंत रूमवर आला नव्हत. त्याच दिवशी धनगरवाडीचे पोलीस पाटील कृष्णा पगडे आणि श्वेता व इतर नातेवाईक हे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोहोचले. ग्रामीण ठाण्यात पोहोचले असताना पुनीतची मोटारसायकल आणि मोबाईल हस्सापूर येथे गोदावरी नदीवरील पुलावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना आढळला होता. १३ मे रोजी पुनीतच्या हरवल्याची नोंद नांदेड ग्रामीण ठाण्यात करण्यात आली. १५ मे रोजी सकाळी नऊ वाजता काही लोकांनी सांगितले की हस्सापूर रोडवरील ब्रिजच्या खाली पाण्यात एक मृतदेह आढळलेला आहे. त्यावेळी श्वेता आणि त्याचा मावस भाऊ प्रज्वल यांनी तेथे पाहणी केली असता तो पुनितचा मृतदेह असल्याचे निदर्शनात आले.
त्याच्या या आत्महत्या प्रकरणी गुरुगोविंद सिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग धनगरवाडी येथील वर्ग शिक्षिका महादेवी कोरे, प्राचार्य श्रीकांत बारटक्के यांनी चालू वर्षाची फीस न भरल्याने असाइनमेंटवर सही करणार नाही आणि इंटरनल मार्क देणार नाही असे सांगून वारंवार वर्गाबाहेर हाकलून दिले. त्याला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. याच तणावातून त्याने वर्गशिक्षिका आणि प्राचार्याच्या त्रासाला कंटाळून १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गोदावरी नदीत हस्सापूर पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुनीतच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनीही केले होते मोठे आंदोलन..१५ मे रोजी गोदावरी नदीत हस्सापूर शिवारात पुनीत वाटकर याचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह आढळताच नर्सिंग कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या विद्यार्थ्यांनी नांदेड ग्रामीण, वजीराबाद पोलीस स्टेशन, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत याप्रकरणी प्राचार्य आणि वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नर्सिंग कॉलेजमधील सर्वच विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्य तसेच त्या वर्गशिक्षिकेच्या कार्यप्रणालीबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. या मागणीसाठी त्यांनी दिवसभर आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी त्यांना कोणीही दाद दिली नव्हती. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आल्याचे स्पष्ट झाले असून नांदेड ग्रामीण पोलिसांनी प्राचार्य आणि वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.