
नांदेड – मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २४ मे रोजी ऑरेंज अलर्ट आणि आज २३ मे सह २५ आणि २७ मे रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यात आज २३ मे आणि उद्या २४ मे रोजी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पाऊस होत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, घरातील विद्युत उपकरणे सुरू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात, तारांची कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहावे तसेच आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईनचा फोनचा वापर करू नये, कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये, धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये आदी बाबतीत खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाची ये जा सुरूच आहे. शेजारील लातूर जिल्ह्यात पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला असून नांदेडमध्येही पावसाचा वेग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.



