महापालिका

अखेर नांदेड महापालिकेने प्रोटोकॉलचे केले पालन… लोकनियुक्त खासदारांच्या प्रमुख उपस्थितीची काढली निमंत्रण पत्रिका

खासदार वसंतराव चव्हाण यांना निमंत्रित करण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांची धावपळ

नादेड – नांदेड महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीचे निधीतून उभारलेल्या शोभानगर भागातील अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यास काँग्रेसच्या नूतन खासदारांना निमंत्रित न करताच १४ जुलै रोजी या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा करण्याचा घाट महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून घातला होता. मात्र ही बाब लक्षात येताच नूतन खासदार वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना भेटून याबाबत थेट हक्कभंगाचा इशारा दिला होता. त्यामुळे स्थानिक मनपा अधिकाऱ्यांनी नमते घेत अखेर कार्यक्रमाच्या काही तास अगोदर एक निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करून त्यावर नूतन खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती नोंदविली आहे. आता या कार्यक्रमास खासदार चव्हाण उपस्थित राहतील की नाही याकडे लक्ष लागले आहे.

महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून वातानुकूलित अशी भव्य अभ्यासिका शोभानगर भागात उभारली आहे. या अभ्यासिकेत जवळपास २०० विद्यार्थी बसण्याची सोय असून इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून या अभ्यासिकेचे काम सुरू आहे. या ना त्या कारणावरून लोकार्पण सोहळा लांबतच गेला आहे. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर सदर अभ्यासिकेचे लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते निश्चित करण्यात आले. मात्र या सोहळ्यास नूतन खासदार वसंतराव चव्हाण यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हा डाव आखण्यात आल्याची बाब खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निदर्शनात आली. त्यावेळी त्यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली. शासकीय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडला तर खबरदार असा इशारा त्यांनी दिला होता. या भेटीनंतर तातडीने सूत्रे हलली आणि कार्यक्रमाच्या काही तास अगोदर महापालिकेने निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करून विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नामोल्लेख निमंत्रण पत्रिकेत केला आहे. १४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. हे निमंत्रण पत्रिका खासदार वसंतराव चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचविण्यात महापालिका अधिकाऱ्यांना यश येईल का आणि खासदार वसंतराव हे या कार्यक्रमास आता उपस्थित राहतील का नाही हेही पहावे लागणार आहे.

लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे वसंतराव या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास या दोघांची जुगलबंदी कशी कशी रंगणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!