प्रशासकीय

नांदेडात नॅचरल गॅस पाईपलाईनचे काम लवकरच सुरू होणार

एकूण १ हजार २०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प, बुलडाणा ते नांदेड २७० कि.मी. पाईपलाईन टाकण्यात येणार, माजी खासदार चिखलीकर यांच्या कार्यकाळात प्रकल्पाला मिळाली होती मंजुरी

नांदेड – छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नांदेड शहरातही नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाला केंद्र शासनाने मंजुरी देताना १ हजार २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला हे काम सोपवले आहे. कंपनीकडून या कामाला आता लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्याचे खासदार असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय पेट्रोलियम समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी चिखलीकर यांनी पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला दिले आहे. नॅचरल गॅस कंपनीकडून गॅस पाईपलाईनच्या कामास लवकरच सुरुवात करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपचा साठा धनगरवाडी येथील गोदाममध्ये करण्यात आला आहे. नांदेडमध्ये गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या कामास नॅचरल कंपनीने सुरुवात केली आहे. शहरालगत असलेल्या धनगरवाडी येथे कंपनीचे गोदाम उभारण्यात आले आहे. कंपनीने अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन मोठ्या प्रमाणात गॅस पाईपलाईनसाठी लागणाऱ्या पाईपचा साठा करण्यास प्राधान्य दिले आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रत्येक घरी गॅस पाईपलाईनव्दारे पोहोचविण्यात येणार आहे. १ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत बुलढाणा ते नांदेड अशी २७० कि.मी. अंतरात पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. हा नॅचरल गॅस पाईपलाईनचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात १७० सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. सिलेंडरपेक्षा हा गॅस ग्राहकांना स्वस्त मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला काम करण्याचे लायसन्स प्रदान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!