नांदेड स्क्रिप्ट विशेष

नांदेड जिल्ह्यावरील पाणीबाणीचे संकट तीन दिवसात झाले दूर

नांदेडची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पासह किवळा साठवण तलावही ८० टक्के भरला

नांदेड – तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात असलेले पाणीबाणीचे संकट केवळ दोन दिवसात दूर झाले आहे. त्यामुळे बळीराजासह श्रावण महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात आनंदी आनंद निर्माण झाला आहे. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पासह नव्यानेच पूर्णत्वास आलेल्या किवळा साठवण तलावातही ८० टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने आता नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपूर्णतः दूर झाला आहे. शनिवारी झालेल्या सर्वदूर पावसाने जिल्ह्यातील इतर जलप्रकल्पही आता समाधानकारक स्थितीत आले आहेत.
२३ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील जवळपास २० जलप्रकल्प कोरडे होते. त्यात नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ १८.४० दलघमी जीवंत जलसाठा म्हणजेज केवळ २२.७८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नांदेडकरांची पाणी चिंता वाढली होती; मात्र २४ तासातच म्हणजे २४ जुलै रोजी ही परिस्थिती बदलली. परभणी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात २४ तासात ६० टक्के जलसाठा वाढला. त्यानंतर २५ आणि २६ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. परिणामी, विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास आणि दुसरा दरवाजा रात्री सव्वा नऊच्या सुमारास उघडण्यात आला आहे. ज्यातून ८७२ क्युमेक वेगाने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील आमदुरा, बळेगाव हे बंधारे भरले आहेत.
त्यात समाधान म्हणजे जिल्ह्यात शनिवारी झालेल्या सर्वदूर पावसाने जिल्ह्यातील इतर जलप्रकल्पातही समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याचवेळी नांदेड शहराला आणखी एक पर्यायी जलस्त्रोत म्हणून उभारण्यात आलेल्या किवळा साठवण तलावातही आजघडीला ८० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटला असल्याचेच चित्र आहे. किवळा साठवण तलावात विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यातून पंपिंगद्वारे पाणी साठवण करण्याची तरतूद आहे. मात्र शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे या किवळा साठवण तलावातही नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मराठवाड्यातील पहिले तरंगते पंप हाऊस किवळ्यात..! किवळा येथील साठवण तलावात नांदेड महापालिका मराठवाड्यातील पहिले तरंगते पंप हाऊस उभारून पाईपलाईनद्वारे असदवन येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणणार आहे. तेथून नवीन नांदेड तसेच इतर भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे नांदेड महापालिकेने किवळा साठवण तलावातून असदवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू केले आहे. पाणीपुरवठ्याचे हे काम अमृत 2.0 अंतर्गत महापालिका पूर्ण करत आहे. यासाठी निधीचीही उपलब्धता असून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काही काळात किवळा साठवण तलावातून नवीन नांदेडला पाणीपुरवठा शक्य होणार आहे. त्यामुळे किवळा साठवण तलावही भरणे नांदेडकरांसाठी आवश्यक होते. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे किवळा साठवण तलावही ८० भरल्याने आता नांदेडकरांची चिंता दूर झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!