
नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुरुवारी रात्री धक्कादायक बदल केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून बिलोलीचे अतुल भोसले यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने अनेकांना धक्काच बसला आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या जवळपास अडीच वर्षांच्या कार्यकाळास अखेर विराम मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पाच खुनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होताच. त्यामुळे पोलीस दलात काही मोठे बदल अपेक्षित होतेच. त्या बदलांना स्थानिक गुन्हा शाखेपासून प्रारंभ झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दल नांदेडमध्ये ४ एप्रिलपासून घडलेल्या गुन्हेगारी टोळीयुद्धामुळे राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि शहरातील सर्वच पोलीस ठाणे अधिकाऱ्यांनी परिस्थिती पूर्व पदावर आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा बंदोबस्तही यशस्वीपणे पार पाडला. तिहेरी खून प्रकरणातील बहुतांश आरोपीही स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या पथकांच्या माध्यमातून जेरबंद केले होते. त्यामुळे आता नांदेडमध्ये पोलिसांची विस्कटलेली घडी पुन्हा बसली असे वाटत होते. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी १८ आणि १९ एप्रिल रोजीच्या दौऱ्यात वेगवेगळ्या विषयांसह जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावाही घेतला होता. या आढाव्यात बिलोलीची किमयागारी कीर्ती पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. त्यांनी सदर बैठकीत त्यांच्या अटॅचमेंटबाबत विचारणाही केली होती. त्याचवेळी माध्यमातूनही प्रारंभी बिलोलीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाकडून एक नव्हे तर दोन वेळा झालेल्या कारवाईचीही मोठी चर्चा झाली होती. दुसऱ्या कारवाईदरम्यान ३४ पैकी ३० हायवा तर अशाच सोडून दिल्या होत्या. पुढे त्या हायवा महसुलच्या आदेशाने सोडल्या असे सांगितले; मात्र ते आदेश शेवटपर्यंत पुढे आलेच नाहीत. या सर्व प्रकरणात भोसले हे उमापांच्या नजरेत आलेच होते. अशा परिस्थितीतही केवळ बिलोली ठाणेच नव्हे तर स्थानिक गुन्हा शाखाही नव्या जोमात मिळवली आहे.
अशा या सर्व चर्चेत बिलोलीत सर्व काही सुरळीत सुरू असताना भोसले हे वर्षभरापासूनच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पद प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतुल भोसले यांना स्थानिक गुन्हा शाखा मिळालीच. २३ एप्रिल रोजी रात्री त्यांनी आपल्या पदाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. या सर्व घडामोडीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक पदासाठी इच्छूक असलेल्या जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांचा मात्र पूर्णतः हिरमोड झाला आहे. वेगवेगळ्या कामगिरीच्या माध्यमातून सतत चर्चेत राहून स्थानिक गुन्हा शाखा मिळावी यासाठी गुन्हेगारीचा बिमोड करण्यात अग्रेसर असलेले नांदेडजवळील अधिकारीही या शर्यतीतून मागे कधी पडले हे कळलेच नाही. त्याचवेळी पोलिसांच्या विशेष शाखेत काम करताना आता आपणच खाली जाणार इतकेच नव्हे तर नावही गेले असे सांगणारे अधिकारीही सध्याच्या धर्माबाद प्रकरणामुळे एलसीबीच्या खुर्चीपासून दूर फेकल्या गेल्याचेच स्पष्ट झाले आहे. पण त्याचवेळी अगदी शांतपणे व्हाया बिलोली अमरवेल जिल्हा पोलीस दलात बहरली असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात जवळपास दीड वर्ष आणि एकाच ठाण्यात कारभार पाहिलेल्या बिलोली पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना आता नांदेड जिल्ह्यात गुन्हेगार पुन्हा डोके वर काढीत असताना पदभार देण्यात आला आहे. या गुन्हेगारीचा, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या मटका, सट्टा, अवैध क्लब आदी अवैध धंद्यांवर आळा घालावा लागणार आहे. अवैध वाळू वाहतूक तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर पोलीस निरीक्षक भोसले उपाययोजना करतीलच; पण जिल्ह्यातील गुन्हेगारी, गुन्हेगारी टोळ्या रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मोठ्या विश्वासाने चर्चेतील सर्व नावे बाजुला करीत आपल्या सुपर व्हेटो पॉवरचा वापर करून भोसले यांच्याकडे पदभार दिला. भोसले यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी रात्रीच धक्कातंत्राचा वापर करत पारही पडला. आता संपूर्ण जिल्हाभरात भोसले यांची नवी इनिंग सुरू झाली आहे. या नव्या इनिंगकडे आता संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.



