
नांदेड – जिल्ह्यात आगामी सण, उत्सवांच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ कंपनी आणि आरसीपी प्लाटूनही बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. बंदोबस्तकामी होमगार्डचीही मदत घेतली जाईल, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आगामी कालावधीतील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तयारीच्या अनुषंगाने ‘नांदेड स्क्रिप्ट’शी संवाद साधला. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार म्हणाले, आगामी काळात श्रावण मासातील उर्वरित दोन आठवडे यासह दहीहंडीचाही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात ११९ ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने भाग्यनगर, इतवारा, वजीराबाद या शहरी भागाचा समावेश आहे. २७ ऑगस्टपासून श्री गणेशाचेही आगमन होणार आहे. याच कालावधीत ईद-ए-मिलादही साजरा होणार आहे. त्यामुळे या सण, उत्सवांच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस दलाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पोलीस दलाचे नियोजन पूर्णतः तयार झाले असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठकही या अनुषंगाने घेतली जाणार आहे.
सण उत्सवांच्या कालावधीत बंदोबस्तासाठी जिल्ह्यात २ हजार पोलीस, अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासोबतच एसआरपीएफची कंपनी आणि आरसीपीच्या पाच प्लाटूनही तैनात केल्या जाणार आहेत. सध्या बंदोबस्तकामी १२०० होमगार्ड पोलिसांच्या मदतीला आहेत. आणखी ३०० होमगार्डची मागणी केल्याचेही अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले. बंदोबस्तकामी प्रत्येक गावातील पोलीस पाटील तसेच ग्रामरक्षक दलाचीही मदत घेतली जाणार आहे. सोबतच गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांशीही समन्वय राखून त्यांनाही सोबत घेतले जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साहही जिल्ह्यात आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण, आत्मदहन व इतर आंदोलनांना बंदी घालण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन निर्भयाअंतर्गत एक कार्यक्रमही घेतला जाईल, असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘नांदेड स्क्रिप्ट’ शी बोलताना स्पष्ट केले.
सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीना आळा घालण्यासाठीही कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक हद्दपारी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. एमपीडी अंतर्गत २०२५ मध्ये १९ गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहेत. त्याचवेळी सीआरपीएफ अंतर्गत एक ते दोन दिवसांसाठी हद्दपार करण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची यादीही तयार आली आहे. प्रत्येक ठाणे अंतर्गत ३० ते ४० जणांना निश्चितपणे हद्दपार केले जाईल. डीजे चालकांसोबतही पोलिसांनी बैठक घेतली जाणार आहे. त्यांनाही आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.



