
नांदेड – जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून शुक्रवारी रात्री घराची भिंत कोसळून कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे एका माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून किनवट, हिमायतनगर, हदगाव यासह इतर तालुकेही जलमय झाले आहेत. हिमायतनगर शहरात पाणीच पाणी झाले असून किनवटचीही परिस्थिती वेगळी नाही.
कोटबाजार येथील ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर शेख आमीन व त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर या शुक्रवारी रात्री घरात झोपलेले असताना त्यांच्या अंगावर भिंत पडली. या घटनेत दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. कंधार, मुखेड, हदगाव या तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता. हा पाऊस शुक्रवारी सुरूच होता. दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक घरांच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत. त्यात कोटबाजार येथील शेख नासेर यांच्या घराची भिंत रात्री कोसळली. त्यात पत्नीसह ते मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिमायतनगर, किनवट, हदगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. किनवट, हिमायतनगर तालुके जलमय झाले आहेत. बोधडी गावानजीक एक स्कूल बस वाहून गेली असून तिचा चालक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलापर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कधीही बंद होऊ शकते अशी परिस्थिती आहे. सध्या परिस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडे असून ईसापुरच्या धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात शनिवारीही पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासात कंधार तालुक्यातील फुलवळ, लोहा तालुक्यातील शेवडी, देगलूर तालुक्यातील माळेगाव आणि हिमायतनगर येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. कंधार तालुक्यातील फुलवळ महसूल मंडळात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून लोहा तालुक्यातील शेवडी महसूल मंडळात १०३.७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात सरासरी ५४.४१ टक्के नोंद झाली आहे.



